उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:45 PM2019-02-23T12:45:20+5:302019-02-23T12:49:55+5:30

गेल्या महिन्यात, झालं गेलं विसरून जाऊन मनोमीलनाचे संकेत देणारे दोन राजे पुन्हा आमने-सामने उभे ठाकणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.     

Shivendraraje and Narendra Patils breakfast diplomacy in Satara, pressure on Udayanraje Bhosale camp | उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!

उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!

googlenewsNext
ठळक मुद्देउदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानं राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांनी या हॉटेलमध्ये एकत्र नाश्ता केला.

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर जोरदार राजकीय वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेटही घेतलीय. या पार्श्वभूमीवरच, शिवेंद्रसिंहराजे आणि भाजपाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील आज एकत्र मिसळ खाताना दिसल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.   

साताऱ्यातील चंद्रविलास हॉटेल मिसळीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. इथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते. परंतु, आज राजकीय तर्रीमुळे इथली मिसळ भलतीच चवदार-चविष्ट होऊन गेली. शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांनी या हॉटेलमध्ये एकत्र नाश्ता केला. त्यांची ही 'ब्रेकफास्ट पे चर्चा' साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या महिन्यात, झालं गेलं विसरून जाऊन मनोमीलनाचे संकेत देणारे दोन राजे पुन्हा आमने-सामने उभे ठाकणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी साताऱ्याचं तिकीट देणार का, याबद्दल अनिश्चितता होती. त्यामुळे उदयनराजे भाजपाच्याही संपर्कात होते. शिवेंद्रराजेंसोबतचा दुरावाही कमी होत असल्याचं दिसत होतं. परंतु, उदयनराजेंची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आणि शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते नाराज झाले. गेल्या आठ दिवसांत त्यांची बैठक झालीय आणि पवारांची भेट घेऊनही त्यांनी आपलं म्हणणं मांडलंय. त्यानंतर, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उदयनराजेंना पाठिंबा द्यायचा का हे ठरवू, अशी भूमिका शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केली आहे.  

दुसरीकडे, भाजपाने नरेंद्र पाटील यांना साताऱ्याच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. साताऱ्यामधील माथाडी कामगारांची मोठी संख्या लक्षात घेऊनच, त्यांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या नावाचा भाजपा विचार करतेय. नरेंद्र पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा होऊ शकेल, असंही भाजपाचं गणित आहे. त्याच दृष्टीने, नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांची भेट महत्त्वाची मानली जातेय. अर्थात, ही राजकीय चर्चा नव्हती, मैत्रिपूर्ण भेट होती, असं नरेंद्र पाटील म्हणताहेत. परंतु, त्यांनी खाल्लेल्या मिसळीमुळे उदयनराजेंना ठसका लागू शकतो, असं बोललं जातंय. 

Web Title: Shivendraraje and Narendra Patils breakfast diplomacy in Satara, pressure on Udayanraje Bhosale camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.