रेवंडे खुनात ‘लोकमत’ वृत्त ठरले ‘सुमोटो’ सातारा पोलिसांकडून गुन्हा दाखल : एकाला अटक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:05 AM2018-02-16T00:05:26+5:302018-02-16T00:06:21+5:30

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

Satyam police register case against 'Sumoto' | रेवंडे खुनात ‘लोकमत’ वृत्त ठरले ‘सुमोटो’ सातारा पोलिसांकडून गुन्हा दाखल : एकाला अटक;

रेवंडे खुनात ‘लोकमत’ वृत्त ठरले ‘सुमोटो’ सातारा पोलिसांकडून गुन्हा दाखल : एकाला अटक;

Next
ठळक मुद्देपरस्पर न्यायनिवाडा करणाऱ्या पंचांचा पर्दाफाश

दत्ता यादव ।
सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेऊन ‘सुमोटो’द्वारे पोलिसांनी गुरुवारी पहाटे पावणेदोन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटकही केली.जितेंद्र हणमंत भोसले (वय ३३, रा. रेवंडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले.

तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. अधीक्षकांनी अधिकाºयांना सुनावल्यानंतर रेवंडे येथे टीम दाखल झाली. त्यानंतर पुढील सुत्रे हालली. त्यानंतर पंच कमिटीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

या प्रकरणामध्ये पोलीस हेड कान्स्टेबल हणमंत सावंत यांनी स्वत: तक्रार दिली असून, तक्रारीत म्हटले आहे की, पीडित मुलीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून लक्ष्मण बाबूराव माने हे दारूच्या नशेत जितेंद्र भोसले याला गावात रस्त्याने येता जाता शिवीगाळ करीत होते. या कारणावरून २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेवंडे गावातील मुख्य रस्त्यावर जितेंद्र भोसले याने लक्ष्मण माने यांच्या डोक्यात कशाने तरी जखम करून त्यांना ठार मारले.

पंच कमिटीने न्यायनिवाड्याची प्रत केली सादर
खुनासारख्या गंभीर घटनेचा न्यायनिवाडा चक्क गावात होतो, हे कायद्याला आव्हान देण्यासारखे होते. गुन्हा कबूल करून पंच कमिटी जो निर्णय देईल, तो संशयितांनी मान्य केला होता. या अजब न्यायनिवाड्याची प्रत सुरुवातीलाच ‘लोकमत’ने पोलीस अधीक्षकांकडे सादर केली होतीच; परंतु खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वत: पंच कमिटीच्या सदस्याने मूळ प्रत तपासी अधिकारी प्रदीपकुमार जाधव यांच्याकडे सादर केली. त्यामुळे आता तपासाला गती मिळणार आहे.

तिघांचे जबाब पूर्ण
खून झाल्यानंतर लक्ष्मण माने यांच्यावर तातडीने अत्यंसंस्कार करण्यात आले असून, पुरावा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांनी सध्या बाबूराव माने, रुक्मिणी माने, विनोद भोसले यांचे जबाब घेतले आहेत. पंच कमिटीतील तेरा जणांचे अद्यापही जबाब घेणे बाकी आहे. हे जबाब पूर्ण झाल्यानंतर या खून प्रकरणातील नेमकी माहिती समोर येणार आहे.

काय आहे रेवंडी प्रकरण...
महाविद्यालयात जाताना एका अल्पवयीन मुलीची तरुणाने छेड काढली होती. त्यानंतर हा प्रकार तिने आपल्या चुलत्याला सांगितला. संबंधित चुलत्याने मुलाला याचा जाब विचारून गावच्या पाराजवळ येऊन शिवीगाळ केली. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीचा चुलता रात्री साडेनऊच्या सुमारास ‘दरडी’ नामक भागात मृतावस्थेत आढळून आला होता.

या प्रकारानंतर गावकºयांमध्ये खळबळ उडाली. एवढेच नव्हे तर घाईघाईत अत्यंविधीही उरकला गेला. या प्रकाराची माहिती बाहेर पडू नये म्हणून प्रचंड खबरदारी घेऊन तातडीची बैठकही बोलविली गेली. या बैठकीमध्ये दोन्ही कुटुंबांसह काही गावकरी होते. ‘माझ्या मुलीची छेड काढली म्हणून जाब विचारायला गेल्यामुळेच संबंधितांनी माझ्या भावाला मारहाण केली. हेच लोक त्याला जबाबदार आहेत,’ असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी या बैठकीत संबंधितांवर केला होता.

या बैठकीमध्ये पंच कमिटी तयार करण्यात आली. या कमिटीने कागदावर अकरा जणांच्या सह्या घेतल्या. त्यामध्ये ‘आमच्यावर केलेला आरोप कबूल असून, या गोष्टीबद्दल ग्रामस्थ जो निर्णय ठरवतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे संबंधित संशयितांनी लिहून दिले. खुनासारखा गुन्हा होऊनही पंच कमिटी परस्पर शिक्षा देणारी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

Web Title: Satyam police register case against 'Sumoto'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.