सातारा : मराठीला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 04:14 PM2018-01-11T16:14:27+5:302018-01-11T16:22:31+5:30

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे,ह्ण असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.

Satara: The Marathi Sahitya Parishad's delegation including Nitin Gadkari, Shivendra Singh Bhajle | सातारा : मराठीला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई येथे नितीन गडकरी यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निवेदन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा शिष्टमंडळाने दिले.

googlenewsNext
ठळक मुद्देमराठीला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेटगडकरींची शिवेंद्रसिंहराजेंसोबत कमराबंद चर्चा

सातारा : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी चळवळ उभी केली आहे. या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, पुणे प्रतिनिधी राजन लाखे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, माजी नगरसेवक अविनाश कदम, डॉ. सचिन जाधव, सुरेंद्र वारद आदींनी शुक्रवारी मुंबई येथे मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निवेदन देण्यात आले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले असून, सांस्कृतिक मंत्रालयाने कृतिशील कार्यवाही सुरू केल्याची माहितील पत्राद्वारे मसापचे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांना कळवली आहे. यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तरी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून २६ जानेवारीपूर्वी यासंदर्भात आश्वासन मिळवून द्यावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी मंत्री गडकरी यांच्याकडे केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची कॅबिनेट नोट तयार केल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याच्यापुढे कार्यवाही झाली नसल्याचे विनोद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यावर मंत्री गडकरी म्हणाले, आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तर माझ्यासाठी अभिमानाचा विषय ठरेल.

राज्यातील ११ कोटी जनतेच्या अस्मितेचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्या असतील तर पंतप्रधानांकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी नक्की आग्रह धरून त्यांचा होकार घेईन,असे आश्वासन गडकरींनी दिले.


गडकरींची शिवेंद्रसिंहराजेंसोबत कमराबंद चर्चा

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर गडकरींनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी कमराबंद चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळाला नसला तरी या भेटीमुळे सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.

Web Title: Satara: The Marathi Sahitya Parishad's delegation including Nitin Gadkari, Shivendra Singh Bhajle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.