सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान, मतदान यंत्रांमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 04:11 PM2019-04-23T16:11:45+5:302019-04-23T16:50:54+5:30

सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके मतदान झाले.  तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी सातारा, माढा लोकसभा मतदार संघासाठी मतदान सुरू झाले.  दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके तर सकाळी अकरा वाजेपर्यंत सातारा मतदार संघात साडेसतरा टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले त्यामुळे संथगतीने मतदान सुरू होते. 

In Satara Lok Sabha constituency, 43.14 percent voting till 3 pm, failure of polling booths | सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान, मतदान यंत्रांमध्ये बिघाड

सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान, मतदान यंत्रांमध्ये बिघाड

Next
ठळक मुद्देसातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदानअनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड कालगावात आठ तर आसनगावमध्ये दहा वाजता सुरुवात

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके मतदान झाले.  तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी सातारा, माढा लोकसभा मतदार संघासाठी मतदान सुरू झाले.  दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके तर सकाळी अकरा वाजेपर्यंत सातारा मतदार संघात साडेसतरा टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले त्यामुळे संथगतीने मतदान सुरू होते.  माढा विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४६.५७ टक्के मतदान झाले. 

ईव्हीएमच्या बिघाडामुळे मतदान प्रक्रिया ठप्प

 माढा लोकसभा मतदार संघातील आसनगाव, ता. कोरेगाव येथील मतदान केंद्रात मंगळवारी सकाळी  ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने दहा वाजेपर्यंत मतदान सुरू झाले नव्हते. आज दुपारी ३ पर्यंत माढा ४४.१० टक्के आणि फलटण ४५.४० टक्के मतदान झाले. आज दुपारी 4.30 पर्यंत जिंती येथील ५०% मतदान झाले .महादेव जानकर यांनी पळसावडे ता.माण येथे मतदानाचा हक्क बजावला,

माढा लोकसभा मतदार संघामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस आणि सातारा जिल्ह्यातील फलटण व माण या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. मतदार संघात सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असताना फलटण विधानसभा मतदार संघातील आसनगाव, ता. कोरगाव येथील मतदान केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून ईव्हीएम मशीनच सुरू झाली नाही.

एका वृद्धाने पहिले मतदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मंडल व फलटण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

दरम्यान, मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांनी मतदान प्रक्रियेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही वेळाने भरारी पथकाने मतदान केंद्रास भेट देऊन अतिरिक्त असलेली नवीन ईव्हीएम मशीन जोडून प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर सुमारे तीन तास एकही मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे या मतदान केंद्रात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे. 

वाई मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४४ टक्के मतदान झाले. दुपारी एक पर्यंत ५ लाख ८७ हजार ६६४ मतदारांनी आपला हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण १८ लाख ३८ हजार १३९ इतके मतदान आहे. मतदारसंघात ११ वाजेपर्यंत म्हणजेच सुरुवातीच्या ४ तासात १७.५० टक्के मतदान झाले होते.

सातारा जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत साडेसतरा टक्के मतदान

सातारा जिल्ह्यातील २,२९६ मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. सातारा मतदार संघातून नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूल, नरेंद्र पाटील यांनी पाटण तालुक्यातील मंद्र्रुळकोळे, माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण, मंत्री महादेव जानकर यांनी माण तालुक्यातील पळसावडे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पाटण तालुक्यातील मारुल हवेली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे मतदानाचा हक्क बजावला.

कऱ्हाड तालुक्यातील कालगाव येथे मतदान केंद्रावर मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे सकाळी आठपर्यंत मतदान थांबले. या ठिकाणी ताटकळत उभे राहण्याची वेळ मतदारांवर आली. तीन मशीन बदलल्या तरीही मतदान यंत्रणा सुरळीत झाली नव्हती.

सुरुवातीला खा. उदयनराजेंच्या घरच्या मैदानावर सातारा विधानसभा मतदार संघात सर्वात कमी १४.१७ तर, शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांचे पाटण विधानसभा क्षेत्रात १८.१० टक्के मतदान झाले होते. कोरेगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १९.६३ पाठोपाठ कऱ्हाड उत्तर १९.३२, कऱ्हाड दक्षिण १७.४० तर वाई विधानसभा मतदार संघात १६.९१ टक्के मतदान झाले.


महाबळेश्वर तालुक्यात सकाळी सुरळीत मतदान सुरू झाले. तालुक्यांत सकाळी सात वाजल्यापासून बारा वाजे पर्यंत ३०.१४ टक्के मतदान पार पडले. जावळी तालुक्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १३ टक्के , दुपारी १ वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान झाले. पाटण तालुक्यात सकाळी ११ पर्यंत २१.२९ टक्के, फलटणमध्ये बारा पर्यन्त २0.६६ टक्के, लोणंदमध्ये दोन वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान झाले.


सासवड (ता फलटण) येथील बूथ क्र ९१ मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करुन फेर मतदानाची मागणी करण्यात आली. या ठिकाणी कोणतेही बटण दाबल्यास घड्याळ चिन्हाला मतदान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

निंबोरे येथे माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. कॉंग्रेसचे माजी प्रदेक्षाध्यक्ष, मंत्री आणि खासदार प्रतापराव भोसले ( वय ८५ वर्षे) यांनी भुईंज येथे मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावले. वाई-खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा निहाय मतदान असे दुपारी १ पर्यंत

वाई - ३१.८१ टक्के, कोरेगाव :३३.५५ , कऱ्हाड उत्तर : ३२.२८, कऱ्हाड दक्षिण :३२.४७, पाटण : ३१.४७, सातारा : ३0.३९ टक्के मतदान झाले.


नवरदेवांनी गाठले मतदान केंद्र

अनेकठिकाणी नवरदेव हळद लागण्याच्या अगोदर मतदानकेंद्रावर मतदानासाठी पोहोचले. भाग क्रमांक ३१५ मध्ये लग्नापूर्वीच एका नवरदेवाने आपला मतदानाचा अधिकार बजावला, तर एके ठिकाणी नवरदेव गांवदेवाला आला अन मतदान करून गेला. महाबळेश्वर मधील बुथ क्रमांक तीन वर नवरदेव घोड्यावर बसून बॅंड बाजा सहित मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल झाला होता.

वयोवृद्ध मतदारांसाठी खास सोय

वयोवृद्ध मतदारांसाठी खास सोय करण्यात आली होती. ९0 वर्षांच्या वृध्दाला स्वंयसेवकांनी वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयातील मतदान केंद्रावर नेले तर मामुर्डी, ता. जावळी येथे श्रीमती वेणूबाई नाथ्याबा धनवडे यांना त्यांचा मुलगा सखाराम धनवडे याने सायकलवरुन मतदानासाठी आणले होते. धनुबाई गोविंद शिंदे या १०२ वयाच्या आजींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला

सखी, वयोवृद्ध मतदारांसाठी सोय

दिव्यांग मतदारांसाठीही मतदान करण्यासाठी खास सोय करण्यात आली होती. जिल्ह्यात प्रत्येक बुथवर लहान बालकासाठी पाळणा घराची सोय करण्यात आली होती. सावित्रीबाईंच्या जन्मभूमीत सखी उभारलेल्या मतदान केंद्रावरही सावित्रीच्या लेकींनी मतदान करुन लोकशाहीचा व समतेचा जागर केला.

मशीन घोटाळ्याने नागरीक वैतागले

लोणंद येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या मतदान केंद्र क्र. ६२ येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना काही काळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. वीस मिनीटांनतरही मशीन सुरळीत न झाल्याने काही मतदार परत गेले तर काहीजणांनी वैतागून तेथेच ठिय्या मारला. जवळवाडी ( मेढा ) येथे मशिन नादुरूस्ती मुळे ४५ मिनिटे ऊशिरा मतदानाला सुरूवात झाली. सकाळपासुनच मतदारांनी सर्वच मतदान केंद्रावर गर्दी केली.

Web Title: In Satara Lok Sabha constituency, 43.14 percent voting till 3 pm, failure of polling booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.