Satara: Initiative for all party leaders including Chief Ministers for the ceremony in the capital, uninterrupted action of Udayan Raj | राजधानीतल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांना आवतण, उदयनराजेंचा अनाकलनीय डाव 

ठळक मुद्देपवार, फडणवीस, ठाकरे, गडकरी, चव्हाण, आठवले एकाच व्यासपीठावरनिवडणुकीच्या तोंडावर आलेला वाढदिवस थाटात साजरा होणार

सातारा : राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधण्यासाठी उदयनराजेंनी अनाकलनीय फासे टाकले आहेत.

सातारकरांच्या जिव्हाळ्याची आणि बरेच वर्षे रखडलेल्या कामांना मुहूर्ताने मार्गी लावण्याचे उदयनराजेंनी ठरविले आहे. कास तलावाची उंची वाढविणे, भुयारी गटर योजनेचा प्रारंभ, पोवईनाक्यावर ग्रेट सेपरेटर, सातारा पालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमीपूजन आदी कार्यक्रम होणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी खासदार उदनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा वाढदिवस थाटात साजरा करण्यासाठी उदयनराजेंच्या मावळ्यांनी उचल खाल्ली आहे.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांच्या सर्वपक्षीय गौरव सोहळा पार पडला होता, त्याच जागेवर मंडप उभारुन किमान १ लाख लोकांच्या उपस्थितीत उदयनराजे सोहळा पार पडणार आहेत. रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असल्याची चर्चा आहे.

शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कास तलाव उंची वाढविण्याच्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर सातारा येथे पोवई नाका गे्रट सेपरेटर आणि भुयारी गटर योजनेच्या कामाचा प्रारंभ केला जाणारआहे. त्यानंतर पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळाही होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर लाखांच्या गर्दीत होणाऱ्या सोहळ्याकडे अवघ्या सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने या सोहळ्याला राजकीय रंग लागण्याची शक्यता आहे; परंतु सोहळ्यात कोणतीही राजकीय चर्चा घडू नये, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. उदयनराजेंनी तीन लोकसभा निवडणुका लढल्या, त्यापैकी दोन निवडणुका त्यांनी सलगपणे जिंकल्या.

पहिल्यावेळी आलेल्या अपयशानंतर आक्रमक पावले उचलणाऱ्या उदयनराजेंनी सर्व पक्षांपेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचे सांगत मोहीमा आखल्या. भूमाता रॅलीच्या अफाट यशामुळे तत्कालीन निर्विवाद सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादीला उदयनराजेंपुढे पायघड्या पसराव्या लागल्या होत्या. निवडणुकीनंतरही उदयनराजे आक्रमक राहिले. त्यांच्या या स्वभावामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदार नाराज झाले. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत तर पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना कोणीच रोखू शकले नाही.

सातारा पालिकेतील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी असणारे मनोमिलन तुटले आहे. स्वपक्षात असणाऱ्या नेतेमंडळींशीही उदयनराजेंचे सख्य उरलेले नाही. मात्र, राजकीय धुरंधर म्हणून ख्याती मिळविलेल्या उदयनराजेंनी सलग झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनाकलनीय डाव टाकून विजयश्री खेचून आणली होती.

नरेंद्र मोदींची लाट असतानाही मागील निवडणुकीत उदयनराजे साताऱ्यांतून विक्रमी मतांनी विजयी झाले होते. आताही उदयनराजेंनी सर्वांच्या आधी सत्तेच्या सारिपाटावर आपले सैन्य आणून ठेवले आहे. त्यांनी खेळलेली पहिली चाल सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली आहे.

नेतेमंडळी एकत्र आले तर?

मागील लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगडावर आले होते. आमंत्रण असूनही उदयनराजेंनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. राष्ट्रवादीअंतर्गत विरोध असतानाही शरद पवारांनी उदयनराजेंना पक्षाचे तिकीट दिले होते. आताही काही अंशी अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आले तर ते परिस्थितीचा अंदाज बांधण्याचे प्रयत्न नक्की करतील, अशी शक्यता आहे.
 


Web Title: Satara: Initiative for all party leaders including Chief Ministers for the ceremony in the capital, uninterrupted action of Udayan Raj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.