ठळक मुद्दे होणारा खर्च, मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

खंडाळा ,दि. ११ : : शासनाने दूध खरेदीचा दर दोन रुपयांनी कमी केला असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दूध डेअरीवर सरासरी केवळ २० ते २२ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. त्यामुळे जनावरांच्या पालनावर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. तर खासगी दूध संकलकांना पदरमोड करून जादा दर द्यावा लागत असल्याने तेही मेटाकुटीला आले आहेत.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, एकीकडे शेती पिकांना हमीभाव नाही तर दुसरीकडे दूध दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांना वार्षिक खर्चाचा ताळमेळ बसवताना महिनावार घरखर्चासाठी दुधाच्या पगारावर अवलंबून राहावे लागते. जनावरांचा चारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कडबा २००० ते ३००० रुपये प्रती शेकडा, गोळी पेंड पोत्यास १५०० रुपये, शेंगदाणा पेंड प्रती क्विंटल ५००० रुपये, ओली मका २००० रुपये प्रती गुंठा असे चाऱ्याचे दर आहेत. त्यामुळे पशुपालनासाठी खाद्यावर मोठा खर्च होत आहे.


दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत. खासगी दूध विक्रीतून प्रती लिटर ४० रुपये दर मिळत असताना डेअरीवर मात्र निम्माच दर मिळत आहे. त्यातही खासगी संकलन केंद्र व शासकीय संकलन केंद्र यामध्येही तफावत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना संतुष्ट ठेवण्यासाठी डेअरी चालकांना पदरमोड करावी लागत आहे. या सर्वच धोरणांमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
 

गायीपालनासाठी खर्चात काटकसर करून चालत नाही. योग्य निगा राखावी लागते . चाऱ्यासह औषधांचाही खर्च असतो. या परिस्थितीत दुधाचे दर कमी करणे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासारखे आहे. शासनाने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून योजना राबविली पाहिजे. मात्र, तसे घडत नाही.
-नवनाथ ससाणे,
दूध उत्पादक