प्रतापसिंह हायस्कूलचे भविष्य रामभरोसे!
प्रतापसिंह हायस्कूलचे भविष्य रामभरोसे!

सागर गुजर-- सातारा --भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ज्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्या साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलचे भविष्य सध्या रामभरोसे आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणारी ही शेतीशाळा ज्या वाड्यात भरते, त्याची डागडुजी केली जात नाही. अन् जिल्हा परिषदेतील राजकारण्यांच्या इच्छाशक्तीअभावी इमारत बांधण्यासाठी शासनाने दिलेला निधीही परत गेला आहे. जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या राजकीय कुस्त्यांमध्ये या हायस्कूलकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद मालकीची पश्चिम महाराष्ट्रात केवळ दोन हायस्कूल आहेत. कोल्हापुरातील राजाराम हायस्कूल आणि साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल या दोन एकेकाळी नावाजलेल्या शाळा. साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल ही शेतीशाळा म्हणून तिची निर्मिती झाली होती. मात्र, यातील शेती काय असते? याचे शिक्षणच या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत नाही, हे दुर्दैव आहे. तब्बल १४ वर्षांपूर्वी या शाळेतील कृषी शिक्षक निवृत्त झाले.
त्यानंतर शाळेला कृषी शिक्षक नेमण्याची बुद्धी जिल्हा परिषदेला सुचलेली नाही.
साताऱ्यातील ऐतिहासिक जुन्या राजवाड्यात हे हायस्कूल सुरू आहे. या वाड्याची डागडुजीही जिल्हा परिषद, पुरातत्व विभाग अथवा बांधकाम विभाग या शासकीय यंत्रणांना करण्याची इच्छा वाटली नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या लाकडी वाड्यात जीव मुठीत घेऊनच शिक्षक आणि विद्यार्थी रोजचा दिवस काढत आहेत. जिल्हा परिषदेला सर्व शिक्षा अभियानातून दोन वर्षांपूर्वी शाळा बांधण्यासाठी मिळालेला निधी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी परत गेला. या शाळेची राधिका रस्त्यावर १८ एकर जागा आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह शेती फार्म आहे. शेती असूनही प्रतापसिंह हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे धडे मिळावेत, हा मूळ हेतूही साध्य झालेला नाही. निधी जसा परत गेला तसा जागेच्या मूळ मालकानेही जिल्हा परिषदेकडून जागा परत मिळावी, यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली असल्याने ही जागाही हातची जाते की काय? अशी परिस्थिती सध्या आहे.
२००० मध्ये प्रतापसिंह हायस्कूलचा पट ५०० इतका होता. सध्याच्या घडीला हाच पट निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या या शाळेत केवळ नऊ शिक्षक आहेत. शिक्षक निवृत्त झाला की त्या ठिकाणी नवीन नियुक्ती करायची नाही आणि घटलेल्या पटसंख्येत वाढ करण्यासाठी नवीन प्रयोगही राबवायचा नाही, याचाच अर्थ ही शाळा बंद करण्याच्या विचारात जिल्हा परिषद आहे का? असा प्रश्न अनेकदा सातारकरांना सतावतो आहे.
वेळ निघून गेल्यानंतर या शाळेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी बाह्यामागे घेतल्या गेल्या तर मात्र ‘बैल गेला... झोपा केला,’ असा प्रकार होण्याची शक्यता या प्रकरणात आहे.


शिक्षकांचे पगार तीन-तीन महिने होईनात...
या शाळेत ९ शिक्षक, ५ शिपाई, १ क्लार्क असा १५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. या कर्मचाऱ्यांचा एप्रिल २०१५ पासून वेळेत पगार होत नाही. तीन-तीन महिने पगार लांबतो. सध्या मे, जून, जुलै या महिन्यांचा पगारच झालेला नाही. या कर्मचाऱ्यांनी विविध कारणांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्तेही वेळेवर जात नाहीत.


प्रतापसिंह हायस्कूलच्या नवनिर्मितीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाला आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. जवळपास २ कोटींचा आराखडा तयार केला आहे, हा आराखडा राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने याची तयारी केली आहे.
- सुभाष नरळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा

प्रतापसिंह शेतीशाळेची जागा हडपण्याचे काही लोकांचे उद्योग सुरू आहेत. तत्कालीन राज्यपालांच्या आदेशानेच ही जागा जिल्हा परिषदेला देण्यात आली होती. आता स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे आदेश दाखवून दिशाभूल केली जात असले तरी जिल्हा परिषदेचे विश्वस्त या नात्याने ही जागा आम्ही जाऊ देणार नाही.
- रवी साळुंखे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद


पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही
प्रतापसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे उपशिक्षणाधिकारी म्हणून बढती मिळालेली आहे. त्यांच्या जागी पदोन्नतीने एकाही शिक्षकाची निवड केली गेली नसल्याने संबंधित उपशिक्षणाधिकाऱ्यांनाच प्रतापसिंह हायस्कूलचेही काम पाहावे लागत आहे. या ओढाताणीत शाळेचे नुकसान होत आहे.


Web Title: Pratapsingh high school's future Rambhosa!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.