खंडाळ्याचा वेग बारामतीपेक्षाही अधिक : शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:09 AM2018-02-24T01:09:38+5:302018-02-24T01:09:38+5:30

 More than Baramati in Khandala: More than a barometer: Help in lifting the livelihood of the farmers | खंडाळ्याचा वेग बारामतीपेक्षाही अधिक : शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यास मदत

खंडाळ्याचा वेग बारामतीपेक्षाही अधिक : शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यास मदत

Next
ठळक मुद्देचार टप्प्यांत सुमारे २५ हजार एकर क्षेत्रात औद्योगिक वसाहत

खंडाळा : तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण, उद्योगधंदे आणि त्याचबरोबर कृष्णामाईचं पाणी शिवारात खळखळू लागल्याने शेतीला मिळणारी उभारी याच्या जीवावर खंडाळा तालुक्याचा विकास बारामतीच्या धरतीवर होऊ शकतो, ही इथल्या सामान्य लोकांची आस आहे. सध्या खंडाळा तालुक्याचा झपाट्याने होत असलेला बदल पाहता राज्यातील सर्वात श्रीमंत तालुका बनण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बारामतीपेक्षा अधिक विकास होऊ शकतो, हा पद्मविभूषण शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरू शकतो. मात्र त्यासाठी प्रगल्भ राजकारणाची साथ मिळणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्याच्या इतिहासात नोंद होणारे आणि राज्यातील पहिला ‘शरद कृषी महोत्सव’ खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन दस्तूरखुद्द शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी प्रदर्शनाचे संयोजक डॉ. नितीन सावंत यांनी लोणंदसह खंडाळा तालुक्याचा विकास बारामतीसारखा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वास्तविक समृद्ध शेती, आधुनिक व्यवसाय, औद्योगिकीकरण, परिपूर्ण शिक्षण व्यवस्था, विकसित वैद्यकीय यंत्रणा यासह अनेक गोष्टींत आदर्शवत ठरणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर म्हणजे बारामती. या विकासात्मक वाटचालीची भुरळ सर्वांनाच पडल्यास वावगे ठरू नये. मात्र, हे सर्वच परिवर्तन प्रबळ राजकारणामुळे शक्य झाले, याचा विसरही पडता कामा नये.

खंडाळा हा तसा परंपरागत दुष्काळी तालुका. मात्र खंडाळ्यासह दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी रामराजेंनी त्यांच्या मंत्री काळात पुढाकार घेतला. डोंगर पोखरून कृष्णेचं पाणी धोम-बलकवडी आणि नीरा-देवघर प्रकल्पाच्या माध्यमातून कालव्याद्वारे तालुक्यात वाहू लागले. अगदी स्वप्नवत वाटणारं हे काम सातत्यपूर्ण प्रयत्नातून साकार झाले. आमदार मकरंद पाटील यांनी त्याला गती दिली. गावोगावच्या शेतकºयांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढला. त्यामुळेच कृष्णेचं पाणी पोहोचू शकले. धोम-बलकवडी कालव्याने १८ गावांचे क्षेत्र तर नीरा-देवघर कालव्याद्वारे २४ गावांचे क्षेत्र लाभक्षेत्रात आले. माळरानाची जमीन ओलिताखाली आल्याने शेती उत्पन्नातून आर्थिक स्तर सुधारल्याने शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

खंडाळ्यात कृष्णेच्या पाण्याबरोबरच उद्योगधंद्यांचीही वाढ होऊ लागली आहे. शिरवळ, खंडाळा, केसुर्डी, लोणंद, अहिरे या परिसरात चार टप्प्यांत सुमारे २५ हजार एकर क्षेत्रात औद्योगिक वसाहत विस्तारली आहे. अद्यापपर्यंत १२० कंपन्यांची उद्योग उभारणी तालुक्यात झाली असून, हा विस्तार ६०० कंपन्यांचे जाळे निर्माण होण्यापर्यंत होऊ घातला आहे. शेजारच्या तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित होत असल्याने त्याचाही फायदा होईल. त्यामुळे तालुक्याचा बहुतांशी भाग कापोर्रेट होत आहे. यामुळे जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. यातून शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावला गेला आहे. औद्योगिकीकरणाने रस्त्यांचे जाळे रुंदावले गेले आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे आशियाई मार्गात रुपांतरण, शिरवळ-बारामती रस्त्याचे चौपदरीकरण, खंडाळा-लोणंद रस्त्याचे रुंदीकरण यासह दळणवळण अधिक सोयीस्कर बनल्याने मोठ्या शहरांशी बाजारपेठ थेट जोडली जात आहे. तालुका विकसनशीलतेकडे झेप घेत असताना गरज आहे, ती परिपूर्ण शिक्षण व्यवस्थेची. स्थानिक तरुण हा कुशल कामगार बनला पाहिजे, यासाठी तंत्रशिक्षण देणारी, कृषी व्यवस्थापन शिकविणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल. यासाठी राजकीय व्यवस्था प्रबळ असणे गरजेचे आहे.

वास्तविक, तालुक्याच्या सर्वच क्षेत्राला दिशा देण्याचे काम आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे. पाणी व्यवस्थापन, शेती सिंचन, बाजार समितीचे आधुनिकीकरण, गावांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण यांसह सर्वांगीण विकासासाठी योजनाबद्ध काम त्यांनी केले. या प्रगल्भ आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाकडे सर्व सत्तास्थाने एकवटल्याने तालुक्याचा कायापालट करणे शक्य झाले आहे. त्यांची हीच उमेद आधुनिक बारामतीचं स्वप्न साकार करेल.

कृषी सभापतिपद लाभदायी...
खंडाळा तालुक्याच्या विकासाबरोबरच शेती पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकरी सुखावला असला तरी अधिक उत्पन्नासाठी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याची गरज ओळखून कृषी सभापती मनोज पवार यांनी शरद कृषी महोत्सवाची संकल्पना राबवली व दरवर्षी प्रदर्शन भरविण्याची जिल्हा परिषदेत तरतूद केली. शिवाय विविध कृषी योजना प्रत्येक गावात पोहोचविण्याची यंत्रणा, सर्व्हिस प्रोव्हायडर या नवयोजनेतून शेती व्यवसाय सुलभ करण्याचा प्रयत्न यामुळे तालुका कृषी क्षेत्रात भरारी घेईल. त्यामुळे तालुक्याला प्रथमच मिळालेले कृषी सभापतिपद लाभदायी ठरत आहे.
 

देशपातळीवरील कृषी शास्त्रज्ञांना आणणार...
आता बागायती क्षेत्र ७० टक्केपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. खरंतर ज्या बारामतीचा आदर्श घेऊन पुढे जाण्याची स्वप्न रंगवले जात आहे. तेथील केवळ २७ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. खंडाळ्याची वाटचाल ही अधिक जमीन पाण्याखाली आल्याने बारामतीपेक्षा अधिक विकास होईल. त्यातच लोणंदला शरद कृषी महोत्सव दरवर्षी होणार असल्याने परदेशातील नवीन तंत्रज्ञान पुरविण्यासाठी व देश पातळीवरील कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने ही शेती समृद्ध होण्यास मदत होईल.

Web Title:  More than Baramati in Khandala: More than a barometer: Help in lifting the livelihood of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.