माऊली... माऊली.... 'हिरा'ऐवजी 'राजा'ने पूर्ण केले पहिले उभे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:47 PM2018-07-14T18:47:24+5:302018-07-14T18:49:14+5:30

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पार पडले. या नयनरम्य सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी

Mauli ... mauli .... instead of 'diamond', 'king' has completed the first standing position | माऊली... माऊली.... 'हिरा'ऐवजी 'राजा'ने पूर्ण केले पहिले उभे रिंगण

माऊली... माऊली.... 'हिरा'ऐवजी 'राजा'ने पूर्ण केले पहिले उभे रिंगण

googlenewsNext

तरडगाव (सातारा): श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पार पडले. दरवर्षी रिंगणात धावणाऱ्या माऊलींच्या हिरा या अश्वाचे पुण्यात निधन झाल्याने राजा या अश्वाने हे रिंगण पूर्ण केले. खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील दीड दिवसाचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा फलटण तालुक्यातील तरडगावकडे एक दिवसाच्या मुक्कामासाठी शनिवारी सकाळी मार्गस्थ झाला. तालुक्याच्या सीमेवर कापडगावजवळील सरदेचा ओढा येथे दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पालखीचे स्वागत करण्यात आले. 

पहिल्या रिंगणाचे वेध लागलेला हा सोहळा भक्तिमय वातावरणात मजल दरमजल करीत पुढे सरकत होता. दुपारी माउलींचा मानाचा नगारखाना रिंगणस्थळी आला, पाठिमागून अश्व आले. त्यानंतर मंदिरासमोर पालखी आल्यानंतर चोपदारांनी रिंगण लावून घेतले. यावेळी परिसरातील भाविक, नागरिकांनी वर्षातून एकदाच दिसणारा नयनरम्य रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सोहळा पाहता यावा म्हणून भाविक मोठ्या वाहनांवर उभे राहिले होते. 
धावत येणाऱ्या माऊलींच्या त्या अश्वांना पाहून स्पर्श करण्यासाठी असंख्य नजरा आतूर झाल्या होत्या. उत्साही वातावरणातच सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी दोन्ही अश्व वैष्णवांच्या मेळ्यातून एकमेकांशी स्पर्धा करीत धावले. या दोन अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत रथाकडे वळून त्यातील पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी जोरात धाव घेत उभे रिंगण पूर्ण केले. यावेळी अश्वांच्या टापाची माती ललाटी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. या सोहळ्यात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

दरम्यान, या नयनरम्य सोहळ्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वारकऱ्यांनी फेर धरीत पारंपरिक खेळ खेळीत अनेकांनी फुगड्या खेळल्या. त्यानंतर हाती भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन व मुखी ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे बोल घेत सोहळ्यातील सहभागी वैष्णव विठ्ठल भेटीच्या ओढीने तरडगावमधील एक दिवसाच्या मुक्कामाकडे वळाले. 

'माऊली माऊली’चा जयघोष'
टाळमृदंगाचा गजर, रोखलेला श्वास, ताणलेल्या नजरा अशा उत्साही व भक्तिमय वातावरणात वैष्णवांचा मेळ्यातून माऊलींच्या व स्वाराच्या अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण करताच सारा आसमंत दुमदुमला. डोळ्यांचे पारणे फेडणारा चांदोबाचा लिंब येथील सोहळा पाहून वारकऱ्यांनी माऊली... माऊली... असा एकच जयघोष केला

पाहा नयनरम्य 'रिंगणसोहळा'

Web Title: Mauli ... mauli .... instead of 'diamond', 'king' has completed the first standing position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.