मांढरदेव : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील श्री काळुबाईची यात्रा शनिवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात अवघा मांढरगड दुमदुमला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच-लांब रांगा रात्रीपासूनच लावल्या होत्या. थंडीची लाट व बोचऱ्या वाऱ्याची तमा न बाळगता दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले.
शनिवारी शाकंभरी पौर्णिमेला सकाळी सात वाजता जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली. त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमेला सकाळी सहा वाजता देवीच्या चौकटीत असणाऱ्या धनश्री खरात व बाळू खरात (रा. आमोंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला. या दाम्पत्याचा देवस्थान ट्रस्टने साडी, चोळी व देवीचा फोटो देऊन सन्मान केला. या पुजेला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू देशपांडे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे, देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, मारुती मांढरे, सतीश मांढरे, रामदास क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर, सुनील मांढरे, माजी सरपंच काळुराम क्षीरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते.
दि. २२ रोजी रात्री देवीचा जागर झाला. रात्रीपासूनच भाविक वेगवेगळ्या वाहनांनी मांढरदेव येथे दाखल झाले होते. पहाटे थंडी प्रचंड होती. तरीसुद्धा भाविकांनी दर्शनासाठी लांबच- लांब रांगा लावल्या होत्या. दर्शन रांगांसाठी उभारलेले वेगवेगळे बॅरिकेटस्मुळे भाविकांना सुरळीत व लवकर दर्शन घेता येत होते. दुपारी बारा वाजता वेगवेगळ्या गावाहून आलेले देव्हारे व पालख्यांमुळे मंदिर परिसरात गर्दी झाली होती. मात्र प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या योग्य नियोजनामुळे भाविकांनी योग्य रितीने दर्शन घेतले.
पोलीस विभागाचे ३०० कर्मचारी मंदिर व मांढरदेव परिसरात तैनात होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस, शीघ्रकृती दलाचे जवान मांढरदेव येथे दाखल झाले होते. त्याचबरोबर बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या साह्याने मंदिर परिसराची तपासणी केली. भाविकांना दर्शन सुलभ रितीने मिळावे यासाठी अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंटचे स्वयंसेवक, व्हाईट सैनिक दलाचे स्वयंसेवक, खंडाळा येथील रेस्क्यू टीम मंदिर परिसरात कार्यरत होती.
अग्निशामक दलाचे बंब कार्यरत होते. वैद्यकीय पथके भाविकांची सेवा करीत होते. पाणीपुरवठा, पशुसंवर्धन विभाग, वीज कंपनीचे कर्मचारी तैनात होते. (वार्ताहर)