Many villages in the district have no adequate facilities for defying dead bodies | जिल्ह्यातील अनेक गावांत मृतदेहांची अवहेलना-अंत्यसंस्कारासाठी पुरेशा सुविधा नाहीत
गोतेवाडी येथे स्मशानशेड नसल्याने अशा पद्धतीने रस्त्याकडेलाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

ठळक मुद्देस्मशानशेड नसल्याने रस्त्याकडेला अगर उघड्या माळावरच दहन

श्रीकांत ºहायकर।
धामोड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. काही ठिकाणी तर स्मशानशेड नसल्याने उघड्यावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गोतेवाडी गावाची अवस्था याहून वेगळी नाही. ‘गाव नुसते नावाला, स्मशानशेड नाही गावाला’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. स्मशानशेड नसल्याने रस्त्याकडेला अगर उघड्या माळावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, आजरा या तालुक्यांत धरण पाणलोट क्षेत्रात व परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. या तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये आजही स्मशानशेड नसल्याने पावसाळ्याच्या दरम्यान या गावातील एखाद्या ग्रामस्थांचे निधन झाले तर त्याच्या अंत्यविधीला अनेक अडथळे येतात. प्रसंगी पत्रे लावून, छत्र्या धरून अंत्यविधी करावा लागतो. काहीवेळेला तर सरण जळतच नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणीही मृतदेहाची हेळसांड होते. त्यामुळे ‘गाव तेथे स्मशानभूमी शेड’ होणे गरजेचे आहे. पण, हे वास्तव असले तरी जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये आजही स्मशानशेड नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी उघड्यावरच मृतदेहांवर अंत्यसंस्काराची सोपस्कार करावी लागतात.

डोंगराळ दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये लोकसंख्या कमी असते. त्यामुळे या ठिकाणी प्रशासन आणि राजकारणी लोकही या समस्येकडे सहजासहजी लक्ष देत नाहीत. काही ठिकाणी जागेचा प्रश्न आहे; काही लोक स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी तयार नाहीत. सरकारी जागा जरी असली तरी त्याच्याशेजारी असणारा खासगी जागामालक स्मशानभूमीस विरोध करीत असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळते. परिणामी ग्रामपंचायत प्रशासनाची इच्छा असतानादेखील केवळ जागेअभावी किंवा गावातील अंतर्गत राजकीय कलहातून ‘स्मशानशेडचाच बळी’ जातो आहे.

ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने स्वखर्चातून सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारणे म्हणजे अग्निदिव्यच. काही वेळेला पाणी बिल तसेच वीज बिल भागविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे गावच्या इतर सुख-सोयी, सुविधा पुरविणे डोईजड होऊन बसते. त्यामुळे राज्य सरकारने ग्रामपंचायतीची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतींना १४ वा वित्त आयोगातून दरवर्षी लाख रुपयांचा निधी देण्याचे धोरण आखले आहे, पण त्यातून स्मशानशेड दुरुस्ती किंवा देखभालीबाबत फारशी शिफारस केली जात नाही.

कोतेत रस्त्यावरच अग्निसंस्कार
कोते ( ता. राधानगरी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणारे गोतेवाडी हे गाव आजही स्मशानशेडविना मृतदेहांवर अग्निसंस्कार रस्त्यावरच करीत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजअखेर या गावाला स्मशानशेड मिळालेले नाही परिणामी शेवटचा दिवस तरी गोड जावा, अशी आशा बाळगणाऱ्या माणसांच्या मृतदेहांची चाललेली ही एकप्रकारे विटंबनाच आहे. किमान आतातरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन मृतदेहांची विटंबना थांबवावी व गावकºयांनाही या त्रासातून मुक्त करावे, एवढीच अपेक्षा.

 


Web Title: Many villages in the district have no adequate facilities for defying dead bodies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.