कमळांचा ‘भाव’.. ..‘नानां’चा डाव!----सातारनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:30 AM2018-06-08T00:30:27+5:302018-06-08T00:46:11+5:30

वाचकहो. मथळ्याचा अर्थ नीट जाणून घ्या. ‘कमळाचा भाव’ म्हणजे बाजारातला दर नव्हे. ‘भाव’ म्हणजे ‘भाऊ.’ जसं पूर्वी कोरेगावात ‘घड्याळ’वाल्यांच्या ‘ताई’ होत्या, तसं जिल्ह्यात म्हणे ‘कमळ’वाल्यांचे ‘भाऊ’ निर्माण झालेत.

The lotus' bhav '.. ..nanan' s hand! ---- sataranama | कमळांचा ‘भाव’.. ..‘नानां’चा डाव!----सातारनामा

कमळांचा ‘भाव’.. ..‘नानां’चा डाव!----सातारनामा

Next
ठळक मुद्दे जगाचा मक्ता घेतलाय की काय ?कुणी कुणाची सुपारी घेतलीय हो ऽऽ...ते तीन भावी भगवे आमदार कोण?

- सचिन जवळकोटे-

वाचकहो. मथळ्याचा अर्थ नीट जाणून घ्या. ‘कमळाचा भाव’ म्हणजे बाजारातला दर नव्हे. ‘भाव’ म्हणजे ‘भाऊ.’ जसं पूर्वी कोरेगावात ‘घड्याळ’वाल्यांच्या ‘ताई’ होत्या, तसं जिल्ह्यात म्हणे ‘कमळ’वाल्यांचे ‘भाऊ’ निर्माण झालेत. आता यांना माणदेशात ‘जयाभाव’ म्हणतात, म्हणून ‘कमळाचा भाव’... आता ‘नानांचा डाव’ म्हणजे ‘गेमागेमी’ नव्हे. ज्यांना आपल्या घरच्या मतदारसंघात लाडक्या लेकराला निवडून आणता येत नाही, ते बिच्चारे ‘नाना’ कसली ‘गेमागेमी’ करणार. आता तुम्ही म्हणाल ‘रडीचा डाव’ का?... अंहं ऽऽ हा तर स्वत:च्या खुर्चीचे अधिकार दाखविण्याचा डाव.



जगाचा मक्ता घेतलाय की काय ?
‘जयाभाव’ तसे पापभिरू. आपण भलं अन् आपला मतदारसंघ बरा म्हणत गपगुमानं करून खाणारे. (आता देशाच्या राजकारणात काहीही न करता ‘कमिशन’ खाण्याचा ट्रेंड आलाय, हा भाग वेगळा.) त्यांना ‘घड्याळ’वाल्यांची गुर्मी म्हणे नेहमीच खटकत आलेली. त्यामुळं त्यांनीही आजपावेतो त्याच गुर्मीच्या भाषेत ‘घड्याळ’ उलट-सुलट फिरविण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला. मात्र, काल त्यांनी ‘घड्याळ’चे फिरविलेले काटे त्यांच्याच ‘हात’वाल्या ‘नानां’ना टोचले. ‘ही तर कमळाची सुपारी’ म्हणत थयथयाट झाला. हे पाहून ‘हात’वाले कार्यकर्ते तर सोडाच, ‘घड्याळ’वाले नेतेही थक्क झाले. ‘नाना’ नेमके कुणाचे अध्यक्ष... ‘हात’वाल्यांचे की ‘घड्याळ’वाल्यांचे, असा प्रश्न सर्वांसमोर आ वासून उभा ठाकला. खरं तर, त्यांचं मूळ दुखणं वेगळंच. ‘घड्याळ’वाल्यांना सल्ला देण्याचा अधिकार ‘नानां’चा असताना नेहमी ‘आपणच साऱ्या जगाचा मक्ता घेतलाय,’ या अविर्भावात ‘जयाभाव’ जे बोलले, ते म्हणे खटकलं.

कुणी कुणाची सुपारी घेतलीय हो ऽऽ...

गेल्या आठवड्यातही याच ‘नानां’नी पाटणकडच्या पाटलांना अनाहूत सल्ला दिला. ‘घड्याळाला विसरू नका,’ हे त्यांनी नरेंद्रांना सांगितलं. तेव्हा कोरेगावच्या ल्हासुर्णेकरांनी उलट ‘नानां’नाच टोमणा मारला. ‘नव-नवे शोध लावणारे आधुनिक गुप्तहेर’ अशा पद्धतीची उपाधीही त्यांना देऊन टाकली. तेव्हा काही कार्यकर्ते खासगीत खुसपुुसले, ‘नस्त्या उठाठेवीची ही पोचपावती.’

या साऱ्या प्रकरणांमुळं एक मात्र स्पष्ट झालं. ‘नानां’ना घड्याळाच्या भवितव्याची लईऽऽ च काळजी वाटू लागलीय. ‘आघाडीचा धर्म’ पाळण्याची त्यांची प्रामाणिक धडपड दाद घेऊन चाललीय. म्हणूनच की काय, त्यांच्याच कार्यकर्त्यांना आता एक जुनी आठवण येऊ लागलीय. पृथ्वीबाबा कऱ्हाडकर राज्याच्या सिंहासनावर असताना बारामतीच्या धाकट्या दादांनी शालजोडीतून आहेर केला होता, ‘साधं जनतेतून निवडून येऊ न शकणाºयांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये.’ त्यावेळी ‘हात’वाले अनेक कार्यकर्ते पेटून उठले होते. ‘नाना’ मात्र शेवटपर्यंत आळीमिळी गुपचिळी करून बसले होते. बावीस वर्षे ‘युवक’ अन् दहा वर्षे ‘फादर’ बॉडीवर असूनही ‘घड्याळ’ कुरवाळण्यात मश्गूल झाले होते. हे सारं आज कार्यकर्त्यांना आठवण्याचं कारण की... कुणी कुठली सुपारी घेतलीय? ‘जयाभाव’नी कमळाची की ‘नानां’नी ‘घड्याळाची’ ? एकच चर्चा.. ज्याच्या-त्याच्या तोंडी.

ते तीन भावी भगवे आमदार कोण?

‘जयाभाव’नी ‘कमळाची सुपारी’ घेतलीय की ‘घड्याळाला चुना’ लावण्याचा ठेका (!) घेतलाय, हे त्यांनाच माहीत. मात्र, जिल्ह्यात ‘कमळानं कात’ टाकायला सुरुवात केलीय, हे मात्र नक्की. त्यामुळं, हे तीन भावी भगवे आमदार कोण, याचा शोध घेणं क्रमप्राप्त.


-‘कऱ्हाड उत्तर’मध्ये शहरातल्या पैलवानाला माती लावण्यासाठी ग्रामीण भागातून अनेकजण शड्डू ठोकू लागलेत. नागठाण्याकडचे ‘मनोजदादा’ आत्तापासूनच पवनचक्कीच्या पात्यांप्रमाणं गावोगावी फिरू लागलेत, तर पुसेसावळीचे ‘धैर्यशीलदादा’ साखरेनंच साखरेचा काटा काढण्याच्या तयारीला लागलेत. मात्र हे दोघेही उभारले तर नेहमीप्रमाणंच ‘कºहाडची पाटीलकी’ भाग्यवान ठरणार, हे ओळखून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांनी ‘चेक अँड मेट’ची व्यूहरचना आखलीय. एकाला एखादं महत्त्वाचं पद देऊन दुसºयाला आखाड्यात उतरविण्याचा ‘गेमप्लॅन’ रचला जातोय. अशातच ‘घड्याळ’वाले सुनीलरावही म्हणे रहिमतपुरातून जागे झालेत. ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय,’ हे गाणं इथल्या शिवारात गुणगुणलं जातंय. अवघड आहे राव.. दोन्ही पक्षांचे अध्यक्ष आपल्याच आमदारांच्या मागं हात धुवून का मागं लागलेत, कुणास ठाऊक !

-‘कोरेगाव’च्या नशिबी नेहमीच बाहेरचा आमदार का वाट्याला येतो, कुणास ठाऊक... कारण खटावच्या ‘महेश’रावांनी म्हणे जिहे-कठापूरच्या पाण्याची शपथ घेऊन प्रतिज्ञा केलीय, ‘आता कोरेगावचा भावी आमदार मीच.’ विशेष म्हणजे ‘निवडून आले तर पालकमंत्रीही म्हणे तेच,’ असं त्यांचे कार्यकर्तेही छातीठोकपणे सांगू लागलेत, कारण कशात काही नसताना ते आत्तापासूनच पालकमंत्री असल्याच्या थाटात ज्या पध्दतीनं सरकारी निधींची घोषणा करू लागलेत, ते पाहून साºयांनाच धन्य-धन्य वाटू लागलंय. खरंतर, त्यांची विकासाची तळमळ समजून घेण्यासारखी. मात्र, प्रोटोकॉलचं काय?

-फलटणमध्ये पुन्हा एकदा ‘दिगंबर’राव कामाला लागलेत. त्यांना ताकद रणजितदादांची अन् सपोर्ट ‘जयाभाव’चा. मात्र, गेल्या वेळेप्रमाणं ऐनवेळी त्यांनी चिन्ह बदललं तर? कारण त्यांच्या भगव्या कमळाला ‘दादा-भाव’ थोडंच ‘हात’ लावणार? ...खरंतर, गेल्या वेळेसच त्यांनी ‘शेतकºयांचा नांगर’ सोडला नसता तर आज त्यांच्या शिवारात आमदारकीचं पीक नक्कीच डोललं असतं. लाटही तशी होतीच म्हणा. जाऊ द्या नां ‘दिगूशेठ’... निवडणूक जिंकण्यासाठी नुसता पैसा असून चालत नाही. जनतेची नसही अचूकपणे ओळखता आली पाहिजे.

Web Title: The lotus' bhav '.. ..nanan' s hand! ---- sataranama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.