ठळक मुद्देकराडवाडीत हजारोंच्या जनसमुदायाकडून अखेरचा निरोपशासकीय इतमामात अंत्यसंस्कार वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी माळावर लोटला हजारोंचा जनसमुदाय जवानांनी दिली मानवंदना, तीन फैरी झाडून सलामी कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

लोणंद ,दि.  ०६ : अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे शहीद झालेले कराडवाडीचे सुपुत्र जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी कराडवाडीच्या सांजेच्या माळावर हजारोंचा जनसमुदाय लोटला होता.


कराडवाडी येथील जवान सुभाष लालासाहेब कराडे (वय ३५) हे भारतीय सैन्य दलामध्ये इंजिनियरिंग युनिट १२० बिग्रेड ४६ मध्ये हवालदारपदी कार्यरत होते. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर टेंगा या सात हजार फूट उंचीवरील डोंगराळ भागात देशसेवा बजावत होते. त्यांना झोपण्यासाठी असलेल्या तंबूमध्ये ऊब देणाऱ्या शेगडीचा शुक्रवार, दि. ३ रोजी रात्री आठच्या सुमारास अचानक भडका उडाला. यामध्ये तंबूला लागलेल्या भीषण आगीत सुभाष कराडे गंभीर जखमी होऊन शहीद झाले.


शहीद सुभाष कराडे यांचे पार्थिव सोमवारी सकाळी नऊ वाजता कराडवाडी येथे आणण्यात आले. तेथे त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी एक तास पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर घरापासून कराडवाडी गावातून फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये जवान सुभाष कराडे यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा निघाली.


अमर रहे, अमर रहे, जय जवान, जय किसान, जब तक सूरज-चाँद रहेगा, सुभाष तेरा नाम रहेगा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. अंत्ययात्रा कराडवाडी, वाघोशी, फाटा येथून सांजोबाचा माळ येथे आणण्यात आली.


यावेळी कोल्हापूरचे चीफ वाय. राणा, जिल्हा सैनिक बोर्डाचे कर्नल आर. आर. जाधव, सुभेदार चंद्रकांत पवार व त्यांच्या जवानांनी मानवंदना देत तीन फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर भाऊ संजय, मुलगा सनी यांनी मुखाग्नी दिला.


प्रशासनातर्फे सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे, बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, दत्तानाना ढमाळ, हणमंतराव साळुंखे, मनोज पवार, दीपाली साळुंखे, उदय कबुले, तहसीलदार विवेक जाधव, सभापती मकरंद मोटे, राजेंद्र तांबे, शोभा जाधव, अनिरुध्द गाढवे, रमेश धायगुडे, गटविकास अधिकारी दीपा बापट, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, रामदास शिंदे, राजेंद्र नेवसे, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, बाळासाहेब शेळके, अशोकराव धायगुडे, सरपंच कुंडलिक कराडे उपस्थित होते.


हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

शहीद सुभाष कराडे यांचे पार्थिव सोमवारी कराडवाडी येथे आणल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले. पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.