भाजी विक्रेतीची मुलगी एमपीएससीत सहावी; आता मंत्रालयात करणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 06:24 PM2018-04-24T18:24:56+5:302018-04-24T18:48:39+5:30

साताऱ्यातील स्नेहा म्हस्केची प्रेरणादायी संघर्षगाथा

inspirational story of vegetable sellers girl after great success in mpsc will work in mantralaya | भाजी विक्रेतीची मुलगी एमपीएससीत सहावी; आता मंत्रालयात करणार काम

भाजी विक्रेतीची मुलगी एमपीएससीत सहावी; आता मंत्रालयात करणार काम

googlenewsNext

सातारा : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर अनेकांनी यशाची शिखरे सर केली आहेत.  मध्यंतरी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा साताऱ्यातील एक युवक मंत्रालयात अधिकारी झाला. त्या पाठोपाठ आता पितृछत्र हरपलेल्या अन् वेळप्रसंगी आईसोबत भाजीविक्री करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या स्नेहा मस्के या तरुणीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालणारी स्नेहा आता मंत्रालयात लिपिक म्हणून काम करणार आहे.

नववीत असतानाच २००२ मध्ये पितृछत्र हरपलेली स्रेहा विलास मस्के हिने मोठ्या जिद्दीनं हे यश संपादन केलं आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यानं स्नेहाची आई भाजी विकून घरचा उदरनिर्वाह चालवते. स्रेहानं एमएससीपर्यंतच शिक्षण झालं आहे. लहानपणापासूनच हुशार असलेल्या स्रेहाला अधिकारी व्हायची इच्छा होती. परंतु वडिलांच्या निधनाने ही इच्छा अपुरी राहते की काय? अशी भीती तिला वाटत होती. मात्र, आईच्या व भावंडांच्या पाठिंब्यावर तिनं हे यश संपादन केले आहे. 

स्नेहाचा मोठा भाऊही यूपीएससीचा अभ्यास करत आहे. भावाच्या मार्गदर्शनाखाली तिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी सुरू ठेवली. कधीकधी स्रेहासुद्धा आईसोबत भाजी विकायला जाते.  एमएससी होऊनसुद्धा नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. मात्र ती काही मिळत नव्हती. मग मोठ्या भावानं एमपीएससीचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आणि तिनं यशाला गवसणी घातली. आता ती मंत्रालयात लिपिक म्हणून काम करणार आहे. खडतर परिस्थितीवर मात्र करून स्नेहाने घेतलेली गननभरारी युवा पिढीला प्रेरणादायी अशीच आहे.

स्नेहानं मोठ्या जिद्दीनं यश मिळवताना स्वत:वर अनेक बंधनं घातली. तरुण पिढी मोबाईलचा अतिवापर करते, अशी तक्रार सगळीकडून होत असताना स्नेहा मात्र मोबाईल वापरत नाही. मात्र एवढ्याच यशावरच थांबायचं नाही, असा निर्धार स्नेहानं केला आहे. 'आईनं माझ्या शिक्षणावर खर्च केला. त्यामुळे मी यशाला गवसणी घातली. भावानं केलेलं मार्गदर्शनदेखील मोलाचं ठरलं. यापुढेही असाच अभ्यास करुन याहून मोठं यश मिळवण्याचा माझा निश्चय आहे,' अशा भावना स्नेहानं व्यक्त केल्या. स्नेहानं मिळवलेल्या यशाचं सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. 
 

Web Title: inspirational story of vegetable sellers girl after great success in mpsc will work in mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.