सातारा : मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना क-हाड येथे घडली आहे. नैराश्यातून या दाम्पत्यानं आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. शनिवारी (28 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. बबन नारायण पवार (वय 60 वर्ष) आणि कमल बबन पवार (वय 52 वर्ष)असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.  पवार दाम्पत्य हे क-हाड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रहिवासी होते.  

बारावीत शिकणारी त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून घरातून अचानक निघून गेली होती. त्यांचा दुसरा मुलगा दहावीला तर तिसरी मुलगी आठवीला आहे. मोठ्या मुलीने प्रेम विवाह केल्याची बातमी मिळाल्यानंतर चार दिवसांपासून हे दाम्पत्य अत्यंत अस्वस्थ होते. रात्री मुले घरात झोपली असताना हे दाम्पत्य गुपचूपपणे घरातून बाहेर पडले. घरापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  पहाटे या परिसरात फिरायला येणा-या लोकांना हे भीषण दृश्य नजरेस पडले. यानंतर घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली.  छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहांचे जागीच विच्छेदन करण्यात आले.