सचिन काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने साताºयात दाखल झालेली आणि येथेच रस्त्याच्याकडेला झोपडी टाकून राहणारी कुटुंब सर्वांनीच पाहिली. या कुटुंबात अवखळपणे काळीमिट्टी होऊन खेळणारी मुलं आणि त्यांच्या भवितव्याविषयीची चिंता कधीच कोणालाच पडली नाही. नोकरीच्या निमित्ताने प्रवासादरम्यान एका अवलिया शिक्षकाची नजर त्यांच्यावर पडली आणि ही कळकट्ट कपड्यातली मुलं शालेय गणवेशात दिसू लागली.
या मुलांच्या पालकांची समजूत काढण्यापासून त्यांना आवरून शाळेत पाठविण्यापर्यंतचा प्रवास अवघड असला तरी अशक्य मात्र नक्कीच नव्हता हे ज्ञानेश्वर कांबळे यांनी सिद्ध करून दाखविले.
वाठार किरोली येथे राहणारे ज्ञानेश्वर कांबळे नोकरीनिमित्त साताºयात स्थायिक झाले. सध्या ते ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक दोनमध्ये कार्यरत आहेत. पूर्वी पालिकेच्या सिद्धी विद्यामंदिर शाळा क्रमांक १९ मध्ये ते नोकरी करीत होते. या शाळेत काम करीत असताना ते दररोज वाठार किलोरी ते सातारा ये-जा करीत असत. याचवेळी त्यांना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात झोपड्या टाकून वास्तव्य करीत असणाºया परप्रांतीय मूर्तीकारांची मुले नजरेस पडली. या मुलांना शिक्षणाचा कोणताही गंध नव्हता. सर्वेक्षणानंतर त्यांना अशी २२ मुले आढळून आली.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार त्यांनी केला. पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर मुलांचे पलिकेच्या सिद्धी विद्यामंदिरात शिक्षण सुरू झशले. ज्ञानेश्वर कांबळे स्वत: आपल्या गाडीतून विद्यार्थ्यांना शाळेत आणत व पुन्हा घरीही सोडत. मातृभाषा मराठी नसूनही अनेक मुलांना लिहिता, वाचता येऊ लागले.
पालिकेच्या ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात बदली झाल्यानंतर कांबळे यांनी मे महिन्यात पुन्हा सर्व्हे केला. यावेळी त्यांना मूर्तीकारांची शिक्षणापासून वंचित असलेली २० मुले आढळून आली. या मुलांनाही त्यांनी ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात दाखल केले आहे.
स्वत:च काढला पास
मुलींचा मोफत प्रवास असल्याने उर्वरित आठ विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर कांबळे यांनी स्वखर्चातून एसटीचा पास काढून दिला आहे. मुलांची शिक्षणाप्रती आवड वाढावी व ते दररोज शाळेत यावे हाच या मागचा उद्देश असल्याचे ज्ञानेश्वर कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.