केवळ निवडणुकांसाठी कोणी रस्त्यावर उतरू नका -सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:08 AM2018-05-22T01:08:31+5:302018-05-22T01:08:31+5:30

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत.

Do not just go out on the road for elections - just plain | केवळ निवडणुकांसाठी कोणी रस्त्यावर उतरू नका -सदाभाऊ खोत

केवळ निवडणुकांसाठी कोणी रस्त्यावर उतरू नका -सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्देमहाबळेश्वरात ‘रयत क्रांती’च्या शिबिराचा समारोप

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. ज्यांनी राजकारण केले त्यांना खरे तर प्रश्न सोडवायचेच नव्हते. कारण जर प्रश्न सुटले तर यांचे राजकारणाचे दुकान कायमचे बंद होणार, ही भीती त्यांना वाटत होती. केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा,’ असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर येथील भाऊसाहेब माळवदे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, उपाध्यक्ष राहुल मोरे, युवा आघाडीचे अध्यक्ष शार्दुल जाधव, सागर खोत, दीपक भोसले, रवींद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

खोत म्हणाले, ‘येथून गेल्यानंतर तळागाळातील लोकांचे व शेतकºयांचे प्रश्न हाती घ्या. पाणी, आरोग्य, शिक्षण व बेकारी यांचे प्रश्न हाती घ्या. ते सोडविण्यासाठी आक्रमकपणे झोकून देऊन काम करा. वैचारिक संघटन तयार करा. बुद्धिवादी लोकांनाही आपल्या या संघटनेचा हेवा वाटला पाहिजे, त्याचवेळी गुंडांनाही आपल्या संघटनेचा धाक वाटला पाहिजे, अशी संघटना बांधा. मतभेद विसरून संकटात धावून जा. संघटनेतील कोणावर अन्याय झाला तर तो एकाकी पडता कामा नये, अशा पद्धतीने त्याच्या पाठीशी उभे राहा, केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा.
पक्षांच्या प्रवक्त्यांना आता जागरुकपणे काम करावे लागणार आहे. आपल्या संघटनेला केवळ पाच महिने झाले आहेत. एका वर्षात या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झालं पाहिजे, असे काम करा, असे आवाहन खोत यांनी केले.

कडधान्य देण्याची सक्ती नको..
पुढील काही महिने तुम्हाला आंदोलने तीव्र करावी लागणार आहेत. पहिले आंदोलन उसाच्या दरासाठी करा. उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिलाच पाहिजे. यासाठी २८ मे रोजी कारखान्यांवर मोटारसायकल मोर्चा काढा आणि निवेदन द्या. दुसरे आंदोलन कडधान्ये नियमनमुक्त करण्यासाठी करावे लागणार आहे. १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करा. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन द्या. आमच्या शेतात पिकलेले कडधान्य आम्ही कोणालाही विकू शकतो. शेती उत्पन्न बाजार समितीमध्येच कडधान्य देण्याची सक्ती आता या पुढे नको, असेही खोत म्हणाले.
 

सर्वांना बरोबर घेऊन काम करा
रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरास माझ्या आमदार फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मी देणार असल्याची घोषणा खोत यांनी या शिबिरात केली. रयत क्रांती ही संघटना कोणत्या एका विशिष्ट धर्माची अथवा जातीची संघटना नाही. ही संघटना राज्यातील अठरापगड जाती-धर्मातील लोकांची आहे. शेतकरी, दिन-दलित दुबळ्या कष्टकरी जनतेची आहे. या सर्वांना बरोबर घेऊन समाजात काम करा, असे आवाहनही खोत यांनी केले.

Web Title: Do not just go out on the road for elections - just plain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.