लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे तुटलेल्या तारेची पूर्वकल्पना वायरमनला देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावला. यामुळे वीज वितरण अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील वाजेगाव-निंबळक हद्दीतील मतकर मळा येथील शेतात विजेची तार खाली पडली होती. याबाबत सकाळी सहा वाजताच संबंधित वायरमनला माहिती दिली होती. मात्र, नेहमीप्रमाणे वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. जनावरांना चारा आणण्यासाठी दीपक मतकर हे पत्नी योगितासोबत सकाळी आठच्या सुमारास चालले असताना खाली पडलेल्या विजेच्या तारेचा अंदाज आला नाही. त्यांचा स्पर्श तारेला झाल्याने दोघांनाही जबर धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्याचवेळी दीपक यांचे चुलते वैरण घेऊन येत होते. त्यांनाही सौम्य धक्का बसला व दीपक व योगिता निपचित पडल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यावर वस्तीवरील सर्वजण पळत आले. काहींनी ट्रान्सफार्मरवरील फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. दीपक व योगिता यांना हलवून पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.
दीपक मतकर यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असून मुलगी दहावीत, तर मुलगा सातवीत शिकत आहेत. त्यांना एक एकर शेती असून, या घटनेने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.
‘महावितरण’विरोधात संताप
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी आले. तहसीलदार विजय पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.
यावेळी तहसीलदार पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वीज वितरण व शासन स्तरावरून मदत देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, घटनेनंतरही महावितरणचा कोणताही अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.