कूल कॅप्टनच्या विकेटसाठी संघातून गुगली-खेळ मांडियेला : अनेकांना पडू लागली हंगामी नगराध्यक्षपदाची स्वप्ने,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:36 AM2018-11-17T00:36:02+5:302018-11-17T00:38:57+5:30

दीपक शिंदे । सातारा : साातारा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याबाबत अनेक कुभांडे रचून पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षातूनही ...

 For the captaincy of Cool Captain, the googly has been played: Many people dream of becoming the president of the seasoned city, | कूल कॅप्टनच्या विकेटसाठी संघातून गुगली-खेळ मांडियेला : अनेकांना पडू लागली हंगामी नगराध्यक्षपदाची स्वप्ने,

कूल कॅप्टनच्या विकेटसाठी संघातून गुगली-खेळ मांडियेला : अनेकांना पडू लागली हंगामी नगराध्यक्षपदाची स्वप्ने,

Next
ठळक मुद्दे राजेंची पाठ वळताच पुन्हा कुरघोड्यांना सुरुवातअन्यथा संघातील हितशत्रू आणि प्रतिस्पर्धी एकत्र झाले तर मॅच फिक्सिंगला वेळ लागणार नाही.

दीपक शिंदे ।
सातारा : साातारा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याबाबत अनेक कुभांडे रचून पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षातूनही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून काही कालावधीसाठीतरी पालिकेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची ताब्यात घेऊन राज करण्याचे अनेकांचे इरादे समोर येत आहेत.

साातारा नगरपालिकेमध्ये मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या उमेदवार माधवी कदम या निवडून आल्या. मनोमिलनाचे पर्व संपून सातारा विकास आघाडी आता विकासाचे पर्व सुरू करत असल्याचे सुतोवाच करण्यात आले. पण, विकासाच्या पर्वात अनेक अडथळे येऊ लागले आहेत. त्यासाठी अनेकदा खुद्द खासदार उदयनराजे भोसले आणि कल्पनाराजे भोसले यांना नगरपालिकेत जाऊन सर्वांची कानउघडणी करावी लागली. पण, नगरसेवकांच्या कागाळ््या काही थांबता थांबेनात. आता तर नगराध्यक्ष स्वत:च राजीनामा देणार अशा प्रकारची चर्चा सुरू करण्यात आली आहे.

नगराध्यक्षांच्या विरोधातच वातावरण तापवत शहराच्या अनेक प्रश्नांवर नगराध्यक्षांना एकाकी पाडण्याचे काम पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे.

शहराचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता असताना मार्केटींग अधिक करण्याचा प्रयत्न होत आहे. या मार्केटींगसाठी एकमेकांना वेठीस धरणे आणि आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे काम सतत सुरू आहे. या बारा भानगडीमध्ये अडकल्यामुळेच शहराच्या विकासाच्या प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष देता येत नाही. सर्वच नगरसेवकांच्या बाबतीत असे होत नाही, काहीजण खरेच प्रामाणिक काम करण्याच्या प्रयत्न आहेत; पण ते बारा भानगडीत कमी दिसतात. ज्यांना काम करायचे नाही फक्त पद भोगायचे अशांची नजर फक्त खुर्चीवरच आहे.

नगराध्यक्ष सध्या करत असलेल्या कामाबाबत अनेकांच्या मनात आसूया आहे. त्यांना काही जमत नाही. त्यांना राजकारण कळत नाही अशा प्रकारचा प्रचारही केला जात आहे. असेलही पण, त्या प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सोबत राहून मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यांना कामाची पद्धत समजावून सांगणे आणि चुकीच्या कामापासून लांब ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली पाहिजे. पण, आपण सांगू त्या पद्धतीने नगराध्यक्ष वागणार असतील तर त्यांना सहकार्य अन्यथा असहकार्य अशीच भूमिका सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांची पहायला मिळत आहे.

नगराध्यक्षांनाही स्वत:चे मत आहे, त्याप्रमाणे त्यांना काही वेळ देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्षांनीही आपल्या नगरसेवकांसोबत जुळवून घेत विरोधकांचा विश्वास जिंकण्याचीही किमया त्यांना करावी लागणार आहे. असे झाले तरच त्या खऱ्या अर्थाने कूल कॅप्टनची भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकतील. अनेक स्वत:चे स्थान तसेच प्रतिस्पर्धी संघावरही दबदबा निर्माण करू शकतली. अन्यथा संघातील हितशत्रू आणि प्रतिस्पर्धी एकत्र झाले तर मॅच फिक्सिंगला वेळ लागणार नाही.

स्वत:ला विचारा हे प्रश्न..
स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याच्या प्रक्रियेत किती नगरसेवकांचा उत्सफूर्त सहभाग आहे. ? प्लास्टिक मुक्तीसाठी किती जण रस्त्यावर उतरून प्रयत्न करतात ? कचºयाच्या प्रश्नावर कोण सतत आवाज उठविते ? शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर कोण गांभीर्याने लक्ष घालते.?
नगरपालिकेतील विविध योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कोणी कोणी आपल्या आपल्या प्रभागात कार्यालये सुरू केली आहेत ? त्या कार्यालयात ते किती वेळ उपलब्ध असतात ? हे प्रश्न जर प्रत्येकाने स्वत:ला विचारले तर शहराच्या आणि आपल्या प्रभागाच्या विकासाचे अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतील.

 

...राजीनाम देणार ही केवळ अफवाच
नगराध्यक्ष म्हणून मी लोकांमधून निवडून आले आहे. त्याबरोबरच खासदार उदयनराजे भोसले यांचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे कोणीही कितीही चुकीची माहिती पसविण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले सांगत नाहीत तोपर्यंत जनतेसाठी काम करतच राहणार.
- माधवी कदम, नगराध्यक्ष,
सातारा नगरपालिका

Web Title:  For the captaincy of Cool Captain, the googly has been played: Many people dream of becoming the president of the seasoned city,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.