सातारकरांच्या पाठीवर सॅकचे ओझे, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:23 PM2019-07-19T14:23:19+5:302019-07-19T14:29:43+5:30

हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागले आहे.

 The burden of the sack on the back of Satarkar, all of them from young to large | सातारकरांच्या पाठीवर सॅकचे ओझे, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच वापर

सातारकरांच्या पाठीवर सॅकचे ओझे, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच वापर

googlenewsNext
ठळक मुद्दे सातारकरांच्या पाठीवर सॅकचे ओझे, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच वापरशास्त्रोक्त पद्धतीने बॅगचा वापर होत नसल्याने वाढतायत आरोग्य समस्या

सातारा : हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागले आहे.

काही वर्षांपूर्वी महाविद्यालयाची पायरी चढल्यानंतरच सॅक पाठीवर यायची. आता अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवरही सॅक आली आहे, त्यामुळे पारंपरिक दप्तर आता अडगळीत आणि आऊट आॅफ फ ॅशन झाले आहे. इंग्रजांची फॅशन म्हणून आपल्याकडे आलेल्या सॅकच्या भारतीय अवतारामुळे पाठीचे आजार वाढू लागले आहेत. या आजार आणि व्याधींना सातारकरही अपवाद नाहीत, हे खेदाने म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सॅक वापरायची असेल तर त्याची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन वापर करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

काय आहे योग्य पद्धत?

पाठीवर सॅक असेल तर त्याचा पूर्ण भार मणक्यावर येतो. काहीजण सॅक कमरेपर्यंत टांगती पाठीवर अडकवतात. यामुळे पाठीच्या मणक्यावर सर्वाधिक ताण पडतो. त्यामुळे सॅक पाठीवर ठेवताना ती लोंबकळती ठेवायची नाही. पाठीवर फिट्ट सॅक बसली तर सामानाचे ओझे दोन्ही खांद्यावर विभागले जाते, त्यामुळे मणक्यावर ताण पडत नाही.

किती सामान बसते?

मध्यम आकाराच्या सॅकमध्ये साधारण दोन दिवसांच्या प्रवासाचे कपडे बसू शकतात. विविध कप्पे असल्यामुळे अन्य सामान बसवणेही सोपे शक्य होते. पाण्याची बाटलीही साईडच्या कप्प्यात ठेवता येत असल्याने त्याला अधिक प्राधान्य दिले जाते.

हे आहेत सॅक वापरणारे...!

  • शाळेतील मुलं
  • महाविद्यालयीन युवा
  • मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह
  • कुरिअर बॉय
  • फिरती नोकरी करणारे
  • गाडीवर प्रवास करणारे
  • प्रवासाला जाणारे
  • मालाचा पुरवठा करणारे


हे नक्की कराच!

  • आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे अनेकांना व्यायामासाठी विशेष वेळ नाही काढता आला तरी काही विशिष्ट हालचाली केल्यामुळे पाठीच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.
  • खूप वेळ एकाच जागेवर बसू नका.
  • विशिष्ट वेळेनंतर जागा आणि बसण्याची पद्धत बदला.
  • हात वर करून ताडासन करण्याचा प्रयत्न करा.
  • ताण देऊन दोन्ही खांदे मागे ओढा शक्य असेल तेव्हा खांदे मागे-पुढे असे हलवा.
  • बसल्या ठिकाणी हात मागे घेऊन पाठ ताठ करण्याचा प्रयत्न करा.
     

सॅकला पर्याय?

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी दप्तर हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. महाविद्यालयात जाणाऱ्यांसाठी स्लिंग बॅग हा उत्तम पर्याय आहे. नोकरीसाठी जाणाऱ्यांना अडकविण्याची बंद असलेली हँडबॅग उत्तम पर्याय आहे.

वाढती क्रेझ कशासाठी

बाजारात सध्या सर्व आकार, रंग आणि प्रकारात सॅक उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, दोनशे रुपयांपासून सॅक मिळू शकते. स्थानिक ठिकाणीही सॅक तयार करणारे असल्याने त्याच्या किमती कमी आहेत. पर्यायाने उपलब्धता आणि वैविधता असल्यामुळे सर्वच वयोगटात सॅकचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत दिवेसंदिवस वाढ होत आहे.

होणारे परिणाम

पाठीवर सॅक अडकवल्याने त्याचा सर्वाधिक ताण मणक्यावर पडतो. त्यामुळे मणक्यातील मज्जारज्जूंवर परिणाम होतो, यामुळे मणक्याचे काही आजारही उद्भवतात.

बालक : मणका पूर्ण तयार होत असताना त्याच्यावर पडलेल्या ताणामुळे पाठीला बाक येण्याची शक्यता असते. मात्र, वाढत्या वयात ते भरून निघण्याची शक्यता अधिक असते. एकाग्रतेची कमतरता, पाठ दुखणे, थकणे यांसारखे त्रास संभवतात.
युवा : चुकीच्या बसण्याच्या पद्धती, एकाच जागेवर बसून राहणे, मोबाईलमुळे सारखी मान खाली घालून बसणे, व्यायामाचा अभाव यामुळे युवांना पाठीचा त्रास जाणवतो. शरीराला आवश्यक प्रथिनांच्या कमतरतेमुळेही पाठीचा त्रास वाढतो.
मध्यमवयीन : गाडी चालवताना रस्त्यावर असलेले खड्डे आणि त्याच्या जोडीला पाठीवर असलेली सॅक अनेक त्रासांचे कारण बनू शकते. कायम फिरते काम असेल तर पाठदुखीच्या आणि पाठीच्या कण्याचा त्रास संभवण्याची शक्यता असते.

महाविद्यालयीन युवांचे हाल

शहरात येणाऱ्या अनेक महाविद्यालयीन युवांना रोज काही तासांचा प्रवास करावा लागतो. सकाळी एसटीने प्रवास, त्यानंतर महाविद्यालयापर्यंत चालत जाणे. महाविद्यालय संपल्यानंतर क्लासपर्यंतची पायपीट आणि पुढे एसटीची वाट पाहण्यासाठी होणारी ताटखळ यामुळे या मुलांना सर्वाधिक वेळ जड सॅक आपल्या पाठीवरच ठेवावी लागते. यासाठी त्यांना शक्य असेल तेव्हा सॅक पाठीवरून काढून ठेवण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

युवतींना त्रास अधिक

महाविद्यालय आणि नोकरीसाठी जाणाऱ्या युवती ज्या सॅकचा वापर करतात, त्यांना त्याचा सर्वाधिक त्रास जाणवतो. बऱ्याचदा मुली सॅक एकाच खांद्यावर अडकवतात, त्यामुळे खांद्याचे आजार उद्भवतात. दुसरीकडे सॅकमध्ये बसेल तेवढे सगळे सामान भरण्याकडे त्यांचा कल असतो, त्यामुळे सॅकचे ओझेही वाढलेले असते. योग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि बसण्याच्या अयोग्य सवयींमुळे पाठीच्या कण्याचा त्रास युवतींना जाणवतो.

Web Title:  The burden of the sack on the back of Satarkar, all of them from young to large

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.