पक्षी उडाले... पिलांचा चिवचिवाट, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:27 PM2019-07-18T12:27:28+5:302019-07-18T12:34:01+5:30

एकेकाळी राजकीय वैभव अनुभवलेल्या जिल्हा काँग्रेसची अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे. काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघून गेले, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनीही नेत्यांसोबत सवता सुभा मांडला. आता पक्षी उडाले... पिलांचा चिवचिवाट, अशी काँग्रेसची स्थिती झालीय. विधानसभेला लढाईसाठी सज्ज झालेल्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाचा अभाव जाणवतोय.

Birds flutter ... Pinch of piglets, Congress status in Satara district | पक्षी उडाले... पिलांचा चिवचिवाट, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती

पक्षी उडाले... पिलांचा चिवचिवाट, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती

Next
ठळक मुद्देपक्षी उडाले... पिलांचा चिवचिवाट, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती लढाईसाठी सज्ज कार्यकर्त्यांना नेतृत्वाचा अभाव; निष्ठावंत कार्यकर्ते सैरभैर

सागर गुजर 

सातारा : एकेकाळी राजकीय वैभव अनुभवलेल्या जिल्हा काँग्रेसची अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे. काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघून गेले, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनीही नेत्यांसोबत सवता सुभा मांडला. आता पक्षी उडाले... पिलांचा चिवचिवाट, अशी काँग्रेसची स्थिती झालीय. विधानसभेला लढाईसाठी सज्ज झालेल्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाचा अभाव जाणवतोय.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकीपर्यंत सर्वच ठिकाणी काँग्रेस चिवटपणे लढली. १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. तरीही काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी चिवटपणे आपले अस्तित्व टिकविण्यावर भर दिला.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर, कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, माण-खटाव, फलटण या विधानसभा मतदार संघांमध्ये काँग्रेस आपले अस्तित्व टिकवून होती. साहजिकच ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली.

विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला. शिवसेना, भाजप या पक्षांना रोखण्यासाठी केंद्रात व राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसने आघाडी केली. त्यानंतर विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढल्या गेल्या.

भाजपचा वारू चौफेर उधळत असतानाही सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने तो रोखून धरला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-शिवसेनेने शिरकाव करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून जोरदार धडका दिल्या. नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदेचे काही गट, पंचायत समितीचे काही गण यामध्ये भाजप-शिवसेनेने फुटवा धरला. मात्र, हे होत असताना काँग्रेसची पाळेमुळे खोडून काढण्याचे कामही भाजप नेत्यांनी केले.


२०१४ पूर्वी राज्याचे नेतृत्व काँग्रेसकडे, तेही सातारा जिल्ह्यात होते. तरीदेखील काँग्रेसला पूर्वीचे दिवस लाभले नाहीत, याची खंत कार्यकर्त्यांना सलत राहत होती. काही काळापुरते जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्यांनी आता आपला लवाजमा भाजपमध्ये नेला आहे. त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला अधिकृत नेतृत्वच उरले नाही. वाई, फलटण तालुक्यांत तर काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त झाली.

माण-खटाव, कऱ्हाड दक्षिण तालुक्यांत काँग्रेस ज्या ताकदीने उभी आहे, त्या पद्धतीने इतर कुठेही पाहायला मिळत नाही. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पक्ष बदलाच्या हालचाली सुरू आहेत. कऱ्हाड उत्तरमधील काँगे्रसचे धैर्यशील कदम यांनीही वेगळा विचार केला तर काँग्रेसचे अस्तित्व केवळ कऱ्हाड दक्षिणपुरतेच मर्यादित राहणार आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बळ अपूर्ण आहे. सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना खंबीर नेतृत्वाची गरज आहे. तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणे जरुरीचे आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत, त्यांच्याकडून उठावदार काम करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

तालुक्यांच्या कार्यकारिणींचे पक्षांतर

वाई, फलटण तालुक्यांतील काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकारिणीने पक्षांतर केले. आपल्या नेत्यांसोबत येथील पदाधिकाऱ्यांनी जाणे पसंद केले आहे. वाई तालुक्यात पक्षाची कार्यकारिणी अस्तित्वात नाही. कुणाचा कुणाला पायपोस नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत; परंतु पक्षवाढीच्या व्यापक विचाराकडेही लक्ष द्यायला हवे.

Web Title: Birds flutter ... Pinch of piglets, Congress status in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.