Another blow to Congress, entry of Ranjitsinh's naik nimbalkar in BJP from Satara | काँग्रेसला आणखी एक धक्का, सातारच्या रणजितसिंहांचा भाजपात प्रवेश
काँग्रेसला आणखी एक धक्का, सातारच्या रणजितसिंहांचा भाजपात प्रवेश

सातारा : काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नाईक निंबाळकर यांनी कमळाचा झेंडा हाती घेतला. रणजितसिंह यांना भाजपाकडून माढ्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या भाजपाप्रवेशावेळी याची घोषणा करण्यात आली नाही.  

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रणजिंतसिंह यांच्या भाजपा प्रवेशाची माहिती दिली होती. निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. माढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशाचा फटका राष्ट्रवादीलाही बसणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार आणि माढ्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रणजितसिंह यांना माढ्यातून उमेदवारी दिल्यास रणजितसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, सध्यातरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांची गोची झाल्याचं बोललं जात आहे. 

याआधी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. रणजितसिंह यांच्या पक्षप्रवेशावेळी मोहिते-पाटील कुटुंबाचा मान राखला जाईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले होते. पण आतापर्यंत भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची वाट धरून उमेदवारी मिळवली. दुसरीकडे रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं निंबाळकर यांनी उमेदवारीसाठी भाजपाची वाट धरली. ते शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पुत्र आहेत.
 


Web Title: Another blow to Congress, entry of Ranjitsinh's naik nimbalkar in BJP from Satara
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.