At Ajinkyaya, now two police teams, robbers and youths try to stop the rubbish | अजिंक्यताऱ्यावर आता पोलिसांची दोन पथके, लुटमार व युवकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देअजिंक्यताऱ्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना बसणार चाप दुपार-संध्याकाळी गस्त घालणार, साध्या वेशात पोलिस फिरणारमंगळाई देवी, चारभिंती परिसर, काळा दगड या परिसरावरही पोलिस लक्ष ठेवणार

सातारा : येथील अजिंक्यताऱ्यावर लुटमारीचे व हुल्लडबाजीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली असून, ही पथके दुपारी आणि सायंकाळी या ठिकाणी गस्त घालणार आहेत.

अजिंक्यताऱ्यावर काही दिवसांपूर्वी भल्या मोठ्या दगडावरून सेल्फी काढताना युवक पडून गंभीर जखमी झाला होता. सध्या त्याच्यावर पुणे येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच महिनाभरापूर्वी एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला होता.

अलीकडे अजिंक्यताऱ्यावर दिवसाढवळ्या असे प्रकार वाढल्यामुळे सातारकर चिंताग्रस्त झाले होते. महाविद्यालयाला सुटी असल्यानंतर अजिंक्यताऱ्यावर फिरण्यासाठी जाणाऱ्या युवकांचा ओढा जास्त असतो. त्यांच्या हुल्लडबाजीमुळे मारामारीचेही प्रकार घडत आहेत. तसेच एकांत ठिकाण पाहून आत्महत्याही होत आहेत.

हे सर्व प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अजिंक्यताऱ्यावर पोलिसांची दोन पथके तैनात करण्यात येणार आहेत. एका पथकामध्ये दोन पोलिस असणार आहेत.

एक पथक दुपारच्यावेळी तर दुसरे पथक संध्याकाळी या ठिकाणी गस्त घालणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना त्यामुळे चाप बसणार आहे. साध्या वेशात पोलिस फिरणार आहेत.

लुटमारीचे प्रकारही आटोक्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळाई देवी, चारभिंती परिसर, काळा दगड या ठिकाणी युवकांची वर्दळ असते. या परिसरावरही पोलिस लक्ष ठेवून असणार आहेत.