बोगस डोंगरी प्रमाणपत्रप्रकरणी १५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 05:00 PM2019-04-30T17:00:57+5:302019-04-30T17:02:56+5:30

बनावट डोंगरी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी प्रवीण सुरेश मसुरे (वय २८, रा. सावरगाव, ता. देदणी, जि. लातूर) याला न्यायालयाने एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर १५ हजार रुपयांच्या बॉण्डची शिक्षा सुनावली.

15 thousand penalty for bogus mountain certificate | बोगस डोंगरी प्रमाणपत्रप्रकरणी १५ हजारांचा दंड

बोगस डोंगरी प्रमाणपत्रप्रकरणी १५ हजारांचा दंड

Next
ठळक मुद्देबोगस डोंगरी प्रमाणपत्रप्रकरणी १५ हजारांचा दंडभाड्याने खोली न दिल्याने मालकावर चाकूने वार

सातारा : बनावट डोंगरी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी प्रवीण सुरेश मसुरे (वय २८, रा. सावरगाव, ता. देदणी, जि. लातूर) याला न्यायालयाने एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर १५ हजार रुपयांच्या बॉण्डची शिक्षा सुनावली.

प्रवीण मसुरे याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे डीएड या शैक्षणिक प्रशिक्षणासाठी बनावट डोंगरी प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवला होता. याबाबत महात्मा फुले जुनियर कॉलेज आॅफ एज्युकेशन सातारचे प्राचार्य शहाजी रंगनाथ डोंगरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार २४ जून २००९ रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, त्याची जामिनावर सुटका झाली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एम. कोरे यांनी या घटनेचा तपास करून १ आॅक्टोबर २०११ मध्ये न्यायालयात त्याच्याविरोधात दोषारोप पत्र सादर केले होते. शहाजी रंगनाथ डोंगरे आणि किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बलदेव सिंह चव्हाण या दोघांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एस. मडके यांनी प्रवीण सुरेश मसुरे याला एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या १५ हजार रुपयांच्या बॉण्डची शिक्षा सुनावली. सरकारी वकील पुष्पा जाधव यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल विद्या कुंभार, वैभव पवार, जयश्री माळी यांनी सहकार्य केले.

संगमनगर येथे जुगार अड्ड्यावर छापा, सहाजणांना अटक : २० हजारांचा ऐवज जप्त

सातारा येथील संगमनगरमधील झोपडपट्टीतील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार खेळताना शहर पोलिसांनी छापा टाकून सहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

बिभीषण लक्ष्मण कांबळे (वय ३८, प्रतापसिंह नगर खेड), प्रमोद उर्फ राजेंद्र बापुसो पोतेकर (वय २९, रा. गुरूदत्ता कॉलनी, संगमनगर सातारा), शंकर हणमंत होसमने (वय ३२, रा. संगममाहुली फाटा परिसर), सोमनाथ शंकर कांबळे (वय ५८, रा. चाहुर, खेड), नीलेश सदाशिव शिंदे (वय कृष्णानगर सातारा), जवाहर लक्ष्मण गायकवाड (वय ३८,रा. प्रतापसिंहनगर, खेड सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 हे सर्वजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे तत्काळ छापा टाकला. यावेळी काहीजणांनी तेथून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पकडलेल्या सहाजणांकडून ३ हजार ८०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य, मोबाईल असा सुमारे २० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

पत्नीस आत्महत्येस प्रवत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

 पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. दशरथ उर्फ संतोष बबन भंडारे (रा. शिवथर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विवाहिता सारिका भंडारे हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन पती दशरथ हा वारंवार मारहाण करत होता.

जेवण चांगले का बनविले नाहीस, असे म्हणून दि. २५ रोजी त्याने पुन्हा भांडण काढले. या त्रासाला कंटाळून सारिकाने घरात असलेले डिझेल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. यात सारिका गंभीर भाजून जखमी झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी सारिकाचे वडील दिलीप गवळी (रा. मुंबई) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पती दशरथ भंडारेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.


भाड्याने खोली न दिल्याने मालकावर चाकूने वार

 भाड्याने खोली न दिल्याने दोघांनी मालकाचा चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता शाहूनगर येथे घडली. जखमी घरमालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथील हिलटॉप कॉलनीमधील राजाराम नेवसे यांच्या बंगला आहे. त्यांच्या बंगल्यामध्ये दोन खोल्या भाड्याने द्यायच्या असल्याबाबची माहिती निशांत बर्गे व प्रवीण निंबाळकर यांना मिळाली. त्यामुळे हे दोघे रूम भाड्याने घेण्यासाठी हिलटॉप कालनीत गेले. त्यावेळी घरमालक राजाराम नेवसे यांनी भाड्याने घर घेण्यासाठी आलेल्या निंशात बर्गे व प्रवीण निंबाळकर यांच्याकडे त्यांची पूर्ण माहिती विचारण्यात सुरूवात केली. त्यावेळी या दोघांनी अर्धवट माहिती दिली.

बाकीची माहिती सांगण्यास नकार दिला. त्यामुळे घरमालक राजाराम नेवसे यांनी खोली पाहण्यासाठी चावी दिली नाही. यामुळे चिडलेल्या दोघांनी नेवसे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ह्यतुला जिंवत ठेवणार नाही,ह्ण असे म्हणत त्यांच्या मानेवर, डोक्याच्या बाजूस चाकूने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर निशांत बर्गे व प्रवीण निंबाळकर हे दोघे पळून गेले. याबाबत राजाराम नेवसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बर्गे आणि निंबाळकरवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 15 thousand penalty for bogus mountain certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.