Lok Sabha Election 2019 झेडपी सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:58 PM2019-04-19T23:58:02+5:302019-04-19T23:58:19+5:30

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषदेतील भाजपच्या काही सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ब्रम्हदेव ...

ZP members have a big headache for angry leaders | Lok Sabha Election 2019 झेडपी सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी

Lok Sabha Election 2019 झेडपी सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी

Next

अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेतील भाजपच्या काही सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ब्रम्हदेव पडळकरांकडून थेट विरोधात प्रचार सुरू आहे, तर शिवाजी डोंगरे, तम्मणगौडा रवी-पाटील यांच्या नाराजीकडे भाजपच्या नेत्यांचे बारीक लक्ष आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचारात नाहीत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उर्वरित सदस्यांनी मात्र मतभेद बाजूला ठेवून प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे.
जिल्हा परिषदेत शिवसेना, विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत आघाडीच्या मदतीने कमळ फुलले आहे. भाजपचे २५, रयत आघाडीचे चार, शिवसेनेचे तीन, विकास आघाडीचे दोन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक, असे भाजपकडे ३५ सदस्यांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे अपक्षासह १५ आणि काँग्रेसचे १० अशी २५ सदस्यसंख्या आहे. आता काँग्रेस आघाडीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्यामुळे त्यांच्या संख्याबळात एकची भर पडणार, तर भाजपची संख्या एकने कमी होणार आहे.
मागील दोन वर्षातील घडामोडींमुळे सध्या जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता डळमळीत झाली आहे. जिल्हा परिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य आणि सभापती ब्रम्हदेव पडळकर यांचे बंधू गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. पडळकर यांनी भाजपपासून फारकत घेतली असून, गोपीचंद पडळकरांच्या प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत.
बुधगाव आणि कवलापूर जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करणारे शिवाजी डोंगरे आणि त्यांच्या पत्नी विद्या डोंगरे यांचाही भाजपच्या प्रचारात म्हणावा तितका सहभाग दिसत नसल्याची नेत्यांमध्ये कुजबूज आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आशा दाखवून भाजप नेत्यांनी फसवणूक केल्याची भावना डोंगरे यांच्या मनात सलत आहे. ते बोलून दाखवत नसले तरी, त्यांच्या प्रचारातील सहभागावरून तसे दिसत आहे. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनीही भाजप नेत्यांच्या कारभारावर टीका केली होती. त्यांचे काही कार्यकर्ते भाजपच्या प्रचारापासून दूर असल्याचे दिसत आहेत. तथापि जत, आटपाडी, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यातील सदस्य भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी असल्याचे दिसत आहे.
बांधकाम व अर्थ समिती सभापती अरुण राजमाने यांनी मिरज पूर्वभागात संजयकाकांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.
मिरज तालुक्यातील एरंडोली गटातील काँग्रेसच्या सदस्या जयश्री तानाजी पाटील आणि त्यांचे पती सलगरेचे सरपंच तानाजी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. दुसऱ्या बाजूला जयश्री पाटील यांच्या विजयासाठी मदत केली असून, त्याची जाण ठेवा, असे भाजपचे नेते तानाजी पाटील यांना सांगत आहेत. यामुळे तानाजी पाटील यांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. .
काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी असतानाही बोरगाव (ता. वाळवा) गटातील काँग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टींच्या प्रचारात दिसत नाहीत. जितेंद्र पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळण्याऐवजी, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.
जितेंद्र पाटील दुरावले
राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी जवळीक केल्यामुळेच जितेंद्र पाटील दुरावल्याची चर्चा आहे. मात्र कुरळपचे राष्ट्रवादीचे सदस्य संजीवकुमार पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी राजू शेट्टींच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.

Web Title: ZP members have a big headache for angry leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.