ठळक मुद्देपुरस्काराचे स्वरुप ११ हजार रुपये रोख, पदक, मानपत्र, शाल व श्रीफळ पुरस्कार प्रदान सोहळा १३ नोव्हेंबर रोजी येथील टिळक स्मारक मंदिरातविष्णुदास भावे नाट्य विद्यामंदिर समितीचे नाट्यचळवळीत भरीव योगदान

सांगली ,दि. ०४ :  देवल स्मारक मंदिरातर्फे यंदाचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार सांगलीच्या भावे नाट्य विद्या मंदिर समितीला जाहीर करण्यात आला आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी येथील टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत धामणीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.


ते म्हणाले की, पुरस्काराचे स्वरुप ११ हजार रुपये रोख, पदक, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ति, संस्था यांना १९९८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी नाट्यचळवळीत भरीव योगदान देणाऱ्या विष्णुदास भावे नाट्य विद्यामंदिर समितीला पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

या समितीने नाट्यचळवळीत मोठे योगदान दिले आहे. आतापर्यंत सांगलीत झालेल्या तिनही नाट्य संमेलनात संस्थेचा मोलाचा वाटा होता. संस्थेने काळोख देत हुंकार, संजीवनी, देवमाणूस, कुलवधु, सुवर्णतुला, मीरामधुरा, कट्यार काळजात घुसली, अशी अनेक नाटके सादर केली आहेत. त्याला पुस्कार व रसिकांचा उदंड प्रतिसादही लाभला आहे.


भावे नाट्य विद्यामंदिर समितीने मान्यवर कलाकारांना विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्याची परंपरा जपली आहे. नृत्य, गायन, वादन कलाही याठिकाणी शिकविल्या जात आहेत. नवोदित कलाकारांना संस्थेचा रंगमंच सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. अशा या मातृसंस्थेला देवल स्मारक मंदिरामार्फत यंदाचा पुरस्का जाहीर करण्यात आला आहे.


सागंलीत येत्या १३ नोव्हेंबरला टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी सायंकाळी ६ वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते आणि महापौर हारुण शिकलगार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. संस्थेने आजवर स्पर्धेतून बक्षिसरुपातून मिळविलेले पैसे बँकेत संकलीत करून त्यावरील व्याजाच्या पैशाने हा कार्यक्रम घेण्यात येतो. देवल यांचे पणतू शरद देवल यांचीही याकामी मदत मिळत आहे, असे ते म्हणाले.


देवल पुरस्काराचे मानकरी

आजवर भालचंद्र पेंढारकर, ज. शं. वाटाणे, जयमाला शिलेदार, प्रसाद सावकार, शरद गोखले, रामदास कामत, पं. तुळशीदास बोरकर, कान्होपात्रा किणीकर, शाांताराम सुर्वे, शिवराम राड्ये, मास्टर अविनाश, विनायकराव थोरात, अरविंद पिळगांवकर, चंद्रकांत उर्फ चंदू डेग्वेकर, मधुवंती दांडेकर, नाना मुळे, श्रीमती फैय्याज, किर्ती शिलेदार यांना यापूर्वी देवल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.