बेडगेत आढळला यादवकालीन शिलालेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:36 PM2019-05-11T14:36:35+5:302019-05-11T14:38:45+5:30

सांगली जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथे मिरज इतिहास संशोधक मंडळाला आढळून आला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवीसन १२२२ मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून आठशे वर्षांपूर्वी मिरज आणि बेडग येथील व्यापाऱ्यांनी शिवमंदिराला दिलेला हा दानलेख आहे.

Yadavaic inscriptions found in Bedgat | बेडगेत आढळला यादवकालीन शिलालेख

बेडगेत आढळला यादवकालीन शिलालेख

Next
ठळक मुद्देबेडगेत आढळला यादवकालीन शिलालेखआठशे वर्षापूर्वीचा इतिहास : मिरज इतिहास संशोधन मंडळाला यश

सांगली : जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथे मिरज इतिहास संशोधक मंडळाला आढळून आला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवीसन १२२२ मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून आठशे वर्षांपूर्वी मिरज आणि बेडग येथील व्यापाऱ्यांनी शिवमंदिराला दिलेला हा दानलेख आहे.

मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेली काही वर्षे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यास सुरू आहे. हा अभ्यास करताना सांगली, सातारा, कोल्हापूर या जिह्यात वेगवेगळ्या गावात वीरगळ, सतीशिळा यावरील लेखांबरोबरच शिलालेख आणि ताम्रपटांचाही अभ्यास मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर करीत आहेत. या अभ्यासात त्यांना अनेक अप्रसिध्द लेख मिळून आले आहेत.

बेडग येथे त्यांना राजवाड्यालगत असणाऱ्या महादेव मंदिरात एक शिलालेख आढळून आला. हा लेख भींतीमध्ये लावण्यात आला आहे. शिलालेख सुमारे तीन फुट उंचीचा असून, तो हळेकन्नड लिपीत आहे. हा शिलालेख दोन टप्प्यात असून, सध्या त्याच्या २८ ओळी वाचता येतात. शिलालेखाच्या वरील भागात मध्यभागी शिवलिंग असून, त्याच्या एका बाजूला सुर्य, चंद्र, नंदी आणि दुसऱ्या बाजूला गाय कोरली आहे. एक भक्त शिवलिंगाची पुजा करतानाही दाखविला आहे.

या लेखात प्रारंभी देवगिरीचा यादव सम्राट दुसरा सिंघण याचा गौरव करणाऱ्या ओळी आहेत. माळवा, गुर्जर या देशातील राजांचा पराभव करणारा, होयसळ आणि तेलगू देशात वादळ माजविणारा प्रतापचक्रवर्ती सिंघण राजा देवगिरी येथे काव्य विनोदात सुखनैवपणे राज्य करीत असताना हे दान दिले असल्याचे यामध्ये म्हटले आहे. हा दान लेख शके ११४४ चित्रभानू संवत्सर, कार्तिक शुध्द प्रतिपदा यादिवशी म्हणजेच इसवी सन १२२२ साली दिला आहे. या लेखात सिंघण देवाचा सेनापती विक्रमदेव याचा उल्लेख आला आहे.

त्यावेळी प्रसिध्द असणाऱ्या वीरवणंज या व्यापाऱ्यांच्या संघटनेचाही उल्लेख यामध्ये आला आहे. या संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक व्यापाऱ्यांची नावे या लेखात दिली आहेत. यामध्ये मेटी सेट्टी, नानी सेट्टी, कुमार सेट्टी आणि या सगळयांचा प्रमुख असणारा सोमय्य यांसह अन्य व्यापाऱ्यांची नावे आहेत. यादव राजाचा सेनापती विक्रमदेव याच्यावतीने मल्लय नामक व्यक्तीमार्फत हा दान लेख दिल्याचे म्हटले आहे.

Web Title: Yadavaic inscriptions found in Bedgat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.