Wrestlers died in accident in Sangli | सांगलीत भीषण अपघातात 6 पैलवानांचा जागीच मृत्यू

सांगली : वांगी (ता. कडेगाव) येथे क्रूझर गाडी व ट्रॅक्टरच्या समोरासमोर झालेल्या अपघातात क्रूझरमधील सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जुन्या सांगली -सातारा रोडवर वांगी गावापासून दक्षिण बाजूस तीन किलोमीटर अंतरावर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

क्रांती तालीम मंडळ, कुंडल (ता. पलुस) येथील १३ पैलवान शुक्रवार दि. १२ रोजी औंध (जि. सातारा ) येथील कुस्ती मैदानासाठी गेले होते. कुस्ती मैदान संपल्यानंनर ते क्रुझर गाडीने (क्र, एमएच १० एएन ७३८५) रात्री साडेअकराच्या दरम्यान कुंडलकडे चालले होते. कुंडलकडून वांगी गावाच्या दिशेने येणा-या ऊस वाहतुक करणा-या ट्रॅक्टरने (क्र. एमएच,२३ डी ८९१४) गाडीला धडक दिली. ट्रॅक्टरचालक दिनकर तुकाराम पवार (रा. राजापुर ता. तासगाव, जि. सांगली) यांचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. वांगी गावापासून ३ किलोमीटर असणा-या चव्हाण वस्तीजवळ ही घटना घडली. धडक जोराची असल्यामुळे एक किलोमीटर परीसरात मोठा आवाज झाला. ट्रॅक्टरचे मोठे चाक फुटले आहे. मागील ट्रॉलीची दोन चाके निघून गेली आहेत व क्रुझरचे पुढील तोंड ट्रॅक्टर ट्रेलरला अडकले आहे. क्रुझरचा चक्काचूर झाला. यामुळे यातील १३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना बाहेर येता येत नव्हते. अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक नागरीकांनी गाडीत अडकलेल्यांना ओढून बोहर काढले. 

यामध्ये विजय शिंदे, आकाश देसाई, शुभम घार्गे, सौरभ माने, अविनाश गायकवाड, रणजीत धनवडे हे ६ जण जागीच ठार झाले होते. तर अजय कासुर्डे, अनिकेत जाधव, अनिकेत गावडे, रितेश चोपडे, अनिल पाटील, प्रतीक निकम, तुषार निकम हे सात जण गंभीर जखमी आहेत. जखमीना तातडीने पलुस येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ट्रॅक्टरचालक दिनकर पवार हा घटनास्थळापासून फरार झाला आहे. चिंचणी वांगी पोलीस अधित तपास करत आहेत .