महांकाली कारखान्याच्या कामगारांचा मोर्चा: थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:35 PM2019-05-16T23:35:13+5:302019-05-16T23:37:07+5:30

अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

Workers' Front of the Mahankali factory: Provident fund with exhausted salary | महांकाली कारखान्याच्या कामगारांचा मोर्चा: थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी

अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन , उपदान देण्याची मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा

कवठेमहांकाळ : अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

महांकाली साखर कारखान्याच्या कामगारांनी २४ एप्रिलपासून थकीत पगार, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी मिळावी, यासाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. परंतु कारखाना प्रशासनाने कामगारांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कामगार संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी हजारोंच्या संख्येने थेट रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. मोर्चाला कारखान्यापासून सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा युववाणी चौक, शिवाजी चौक यामार्गे मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयाच्या आवारात आला. यावेळी ‘घामाचे दाम मिळालेच पाहिजे’, ‘गली गली मे शोर है कारखानदार चोर है’, ‘वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कामगार नेते नेताजी पाटील म्हणाले की, १५ वर्षे झाली कामगारांची गळचेपी सुरू आहे. कामगारांचे संसार देशोधडीला लागले. मात्र कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांची संपत्ती शेकडो कोटीत गेली आहे. याची चौकशी झाली पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता हे आंदोलन मागे घेणार नाही. हा निर्णायक लढा आम्ही जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. खराडे म्हणाले, कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना कामगारांच्या पाठीशी ठाम उभी राहील. तसेच कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक मनोज सगरे यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांना हटवावे.

बळीराजा संघटनेचे नेते उमेश पाटील म्हणाले, कामगारांच्या कष्टावर हा कारखाना नावारूपाला आला आहे. मात्र कारखाना अध्यक्ष व कार्यकारी संचालक हा कारखाना स्वत:चा असल्यासारखे वागत आहेत. कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे.यावेळी सूरज पाटील, महादेव माळी, उद्धव पाटील, पंडितराव शिंदे, नारायण पाटील, हणमंत कुंभारकर, शहाजी कोळेकर, कलाप्पा फुटाणे, विठ्ठल जाधव, नंदकुमार पाटील यांच्यासह साखर कारखान्याचे हजारो कामगार आंदोलनामध्ये सहभागी होते.

राज्यकर्त्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष
निवडणुकीवेळी मतांचे राजकारण करणारे, उपेक्षित, वंचित, कामगारांचे स्वत:ला नेते म्हणवून घेणारे राजकीय नेते या आंदोलनाकडे फिरकले नाहीत, याची चर्चा कामगारांमध्ये होती. मते मागायला हे लोकप्रतिनिधी आमच्या दारात येऊ देत, त्यांना आम्ही जागा दाखवून देऊ, असे कामगारांनी यावेळी सांगितले.

कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या....
११ महिन्यांचा थकीत पगार त्वरित द्यावा.
३६ महिन्यांची ग्रॅच्युईटी आणि फंडाची रक्कम भरावी.
कामगारांना महिन्याच्या महिन्याला पगार देण्यात यावा.
कारखाना प्रशासनाची सीबीआय चौकशी करण्यात यावी.
शेतकऱ्यांची बिले द्यावीत.
कारखान्यावरील कर्जाचा व व्याजाचा आकडा त्वरित जाहीर करावा.

संपत्तीची चौकशी करा
बळीराजा शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी कामगारांना आधार देत पाठिंबा दिला. प्रभारी कार्यकारी संचालक मनोज सगरे व कारखाना अध्यक्ष यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली.

प्रथमच रस्त्यावर
कारखान्याच्या स्थापनेच्या इतिहासात प्रथमच कामगारांनी कारखाना प्रशासनाच्या अन्यायाविरोधात एकीची वज्रमूठ बांधत आंदोलन केले. याची तालुकाभर चर्चा होती.


 

Web Title: Workers' Front of the Mahankali factory: Provident fund with exhausted salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.