भरतनाट्यम्द्वारे अभिश्री साकारणार ‘विठाई दर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:22 AM2017-12-25T00:22:53+5:302017-12-25T00:24:06+5:30

'Vithai Darshan' will be done by Bharatnatyam | भरतनाट्यम्द्वारे अभिश्री साकारणार ‘विठाई दर्शन’

भरतनाट्यम्द्वारे अभिश्री साकारणार ‘विठाई दर्शन’

Next

बाबासाहेब परीट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिळाशी : कला ही वेडाची बहीण आहे. कलेची साधना अंतर्मनातून केली तर, जीवन समृध्द होते. सातत्यपूर्ण सराव आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तामिळनाडूस्थित कोकरुड (ता. शिराळा, जि. सांगली) येथील लेकीने वयाच्या १५ व्यावर्षी भरतनाट्यम् या नृत्यप्रकारात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. अभिश्री आनंद पाटील ही युवा नृत्यांगना कोल्हापूरच्या शाहू स्मारकामध्ये आज घडविणार आहे ‘विठाई दर्शन..!’
अभिश्री पाटील ही तामिळनाडूचे सचिव व कोकरुड (ता. शिराळा) येथील आयएएस अधिकारी आनंद पाटील यांची कन्या. घरात कोणतीही नृत्याची पूर्वपिठिका नसताना इयत्ता तिसरीत अभिश्रीला भरतनाट्यम्ची आवड निर्माण झाली. आई राजश्री पाटील या एम. बी. ए. व इंजिनिअर आहेत. त्यांनी तिच्यातील नृत्यकलेला ओळखले आणि प्रोत्साहित केले.
भरतनाट्यम् नृत्यांगना वासंती श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिश्रीने नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली.
नियमित सराव आणि कलेवरची श्रध्दा, योग्य मार्गदर्शन यामुळे अभिश्रीचा आत्मविश्वास वाढत गेला आणि तिने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. सध्या अभिश्री इयत्ता अकरावीत शिकते. दहावीत ती विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. तिचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ व फ्रेंच आदी भाषांवर प्रचंड प्रभुत्व आहे. वडील सनदी अधिकारी असले तरी, शिक्षणाबरोबर एखादी कला आत्मसात करावी, अशी त्यांचीही अपेक्षा होती. त्यामुळेच त्यांनी तिला या कला प्रकारासाठी उत्तेजन दिले, तर आई राजश्री यांनी कलेसाठी उत्तेजन देऊन त्यासाठी लागणारा वेळही दिला. आजोबा लक्ष्मण पाटील यांनीही तिला बळ दिले. भरतनाट्यम्मध्ये अव्वल स्थान पटकावण्याचा तिचा इरादा आहे. दररोज ती एक तास सराव करते.
गुरु वासंती श्रीधर या दिल्लीवरुन फेस टाईम या अ‍ॅपद्वारे तिला मार्गदर्शन करतात. ‘स्वयंम निर्मिती सावळे विठाई’ या शिर्षकाखाली ३ तासांचा भरतनाट्यम्चा प्रयोग करुन एका वेगळ्या नृत्य प्रकारात मराठी लेक सामर्थ्याने उभी रहात आहे. मुद्रा अभियनातही तिने अल्पावधित स्वत:चा वकूब निर्माण केला आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी आर्तपणे व्याकुळ हाक देणाºया भक्तरूपी नर्तिका (अभिश्री) स्वत:ला विठ्ठलमय करुन टाकत रसिकांना प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाचा साक्षात्कार घडवणार आहे.
कोल्हापूरच्या शाहू स्मारकात आज कार्यक्रम
कोल्हापूर येथील शाहू स्मारकात सायंकाळी ४ वाजता होणाºया कार्यक्रमात अभिश्रीला बहुविध अभिनय, निपुणता दर्शविणाºया नृत्यासाठी तंजावर केशवंत (मृदंग), रघू राम (बासरी), वासंती कृष्णराव (गायन), वासंती श्रीधर (बोल) आदी दिग्गज कलाकार साथ देणार आहेत.

Web Title: 'Vithai Darshan' will be done by Bharatnatyam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली