लोकमत न्यूज नेटवर्क
देवराष्ट्रे : वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेले सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या स्थळाचे पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग व्हावं, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी व्यक्त केले.
वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट व कडेगाव-खानापूर तालुका मराठी साहित्य परिषदेच्यावतीने वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त सागरेश्वर अभयारण्यात आयोजित केलेल्या ‘आपली शिदोरी-आपले संमेलन’ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे, महेश कराडकर, वनक्षेत्रपाल सतीश साळी, प्रा. श्रीकृष्ण मोहिते उपस्थित होते.
आडसूळ म्हणाले, धों. म. अण्णांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वृक्षलागवड चळवळ हाती घेणे आवश्यक आहे. या कामात लोकसहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तरुणाईने सक्रिय व्हावे. गटविकास अधिकारी रोकडे म्हणाले, महाविद्यालयात असताना या परिसरात आलो आहे. परंतु अधिकारी म्हणून पहिल्यांदाच आलो आहे. धों.म.नी सागरेश्वर अभयारण्याच्या रूपाने देशपातळीवर नाव पोहोचवले आहे.
यावेळी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे छायाचित्रकार प्रदीप सुतार यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार रविकांत आडसूळ, राहुल रोकडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
स्वागत साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी केले. आभार बी. एम. जमादार यांनी मानले. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. कार्यक्रमास सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक एस. एल. झुरे, प्रदीपकुमार कुडाळकर, अरुण लंगोटे, प्रा. बी. डी. कदम, रामचंद्र यादव, राम सुतार, विनायक सुतार, समीर पाटील, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, संदीप नाझरे, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.