विठ्ठलवाडीत रस्त्यावर सापडलेले तब्बल तीन लाख रुपये प्रामाणिकपणे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:26 PM2019-05-19T23:26:56+5:302019-05-19T23:27:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : विठ्ठलवाडी-कामेरी (ता. वाळवा) येथील विलास बारपटे हे सकाळी फिरायला गेले असता, त्यांना पाणंद रस्त्यावर ...

Three lakh rupees in the streets of Vitthalwadi were honestly returned | विठ्ठलवाडीत रस्त्यावर सापडलेले तब्बल तीन लाख रुपये प्रामाणिकपणे केले परत

विठ्ठलवाडीत रस्त्यावर सापडलेले तब्बल तीन लाख रुपये प्रामाणिकपणे केले परत

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : विठ्ठलवाडी-कामेरी (ता. वाळवा) येथील विलास बारपटे हे सकाळी फिरायला गेले असता, त्यांना पाणंद रस्त्यावर पसरुन पडलेले तब्बल तीन लाख रुपये सापडले. हे पैसे कोणाचे आहेत, याचा शोध घेऊन त्यांनी, विहीर खोदकाम करणाऱ्या मजुराचे असलेले हे सर्व पैसे संबंधिताला प्रामाणिकपणे परत केले. या घटनेने सामान्य माणसात माणुसकी आजही जिवंत आहे, याचे दर्शन घडले.
विलास बारपटे हे विठ्ठलवाडी येथील एका सर्वसामान्य कुटुंबातीलच. केवळ २० गुंठे जमीन. दररोज सकाळी ६ वाजता फिरायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. रविवारी सकाळीही ते फिरायला गेले असता, पाणंद रस्त्यावर त्यांना नोटांची बंडले पडलेली दिसली. विलास बारपटेंनी ती नोटांची बंडले गोळा करून जवळ असलेल्या लुंगीत बांधली. तेथून ते येताना, वाटेत भेटणारे, लुंगीत काय आहे? असे विचारत होते. त्यावर बारपटे यांनी आंबे आहेत, असे सांगितले.
घरी आल्यानंतर विलास बारपटे यांनी सर्व हकीकत कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी पैशाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला हे पैसे परत करायचे, असे ठरविले. त्यादिवशी दुपारी विलास हे मित्राच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला गेले.
दुपारी परत आल्यानंतर पैशाच्या मालकाचा शोध सुरू झाला. त्याच रस्त्यावर अंगावर पातळाची लक्तरं झालेली एक म्हातारी बाई जे काही बोलत होती, त्यापैकी ‘पाचशेची बंडलं’ हा शब्द विलास यांनी ऐकला आणि ते थांबले. ती म्हातारी त्याच पैशाच्या शोधात फिरत होती. विलासने त्या म्हातारीला घेतले व त्यांच्या खोपटावर गेले. म्हातारी पैसे हरवल्याने रडत होती.
बाळू गोपी चव्हाण या मजुराने गावातीलच जोतिराम बापू पाटील या शेतकºयाची विहीर खोदण्याचे काम घेतले होते. त्या कामापोटी ५ लाख रुपये बाळू चव्हाण यांना दिले होते. ते पैसे घेऊन बाळू चव्हाण खोपटावर आले. जेवणाच्या पिशवीत पैसे ठेवले व ते झोपले. रात्री एक भटके कुत्रे खोपटात शिरले. त्याला त्या जेवणाच्या पिशवीचा वास आला. खायला मिळेल म्हणून कुत्र्याने पिशवी पळवली. कुत्र्याने ही पिशवी शेतातील पाणंद रस्त्यावर आणली. पिशवीत खायला मिळेल म्हणून कुत्र्याने पिशवी फाडली अन् त्यातील पैसे बाहेर पडले.
हेच पैसे विलास बारपटे यांना सापडले होते. स्वत:ची परिस्थिती बेताची असतानाही बारपटे यांनी प्रामाणिकपणे हे पैसे संबंधिताला देऊन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. विहीर मालक जोती पाटील व प्रा. अनिल पाटील यांना बोलावून हे पैसे बाळू चव्हाण यांना परत केले.
विलास बारपटे यांनी एका गरीब, कष्टकरी मजुराचे पैसे प्रामाणिकपणे परत करून, अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Three lakh rupees in the streets of Vitthalwadi were honestly returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.