भिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून? नितीन चौगुले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 06:17 PM2018-06-14T18:17:57+5:302018-06-14T18:17:57+5:30

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

There are no fields of mangoes - Nitin Chougule | भिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून? नितीन चौगुले

भिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून? नितीन चौगुले

googlenewsNext

मित्राचा किस्सा बोलून दाखविला; माध्यमांकडून विपर्यास

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. भिंडेंची शेतीच नाही, ते औषधी आंबा देणार कोठून? त्यांच्या मित्राने शेतात लावलेल्या आंब्यामुळे अनेक महिलांना पुत्रप्राप्ती झाल्याचा किस्सा बोलून दाखविला होता. तो भिडेंनी सांगितला. पण माध्यमांनी भिडेच असे बोलल्याचे दाखवून त्यांची बदनामी केली आहे, असेही चौगुले यांनी सांगितले. 
भिडे यांनी नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी ‘माझ्या शेतातीत आंबा खाल्ल्याने महिलांना पुत्रप्राप्ती होते. आतापर्यंत १८० महिलांना या आंब्याचा गुण आला आहे’, असा दावा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यामांनी प्रसिद्ध केले होते. भिडेंच्या या विधानाचा अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. सोशल मीडियावरुनही या विधानाची खिल्ली उडविण्यात आली. अजूनही सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. त्यामुळे चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. नाशिकच्या सभेत भिडे काय बोलले, माध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास कसा केला, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
चौगुले म्हणाले, भिडे यांंना मांजर्डे येथील त्यांचे परिचित मोहनराव शिवाजीराव मोहिते हे तब्बल ३५ वर्षांनी भेटले. त्यांच्यात गप्पा रंगत गेल्या. त्यावेळी मोहिते यांनी भिडेंना सांगितले की, मला फळबाग शेतीची खूप आवड आहे. मी धाराशीव जिल्ह्यात गेलो होती. तिथे मला आंब्याच्या ११० प्रकारच्या जाती आढळून आल्या. भगवंताच्या कृपेने मला एक कोय मिळाली. या कोयीचं रोपटं करुन ते झाड वाढवलं. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे, ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन दहा-बारा वर्षे होऊनसुद्धा ज्यांना पोरं होत नाहीत, अशा पती-पत्नींनी या झाडाचा आंबा खाल्ला, तर त्यांना निश्चित पोरं होतात. मी आतापर्यंत १८० दाम्पत्यांना हे आंबे खायला दिलेत. यातील दीडशेपेक्षा जास्तजणांना मुलं झाली आहेत. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असा हा वंध्यत्वावरचा गुणकारी आंबा आहे. 

चौगुले पुढे म्हणाले, मोहिते यांनी जो किस्सा सांगितला, तोच भिडेंनी नाशिकच्या सभेत कथन केला. अडीच तास त्यांचे भाषण सुरु राहिले. पण माध्यमांनी नेमके त्यांचे आंब्याच्याबाबतीतील तीन मिनिटांचे विधानच प्रसिद्ध केले, तेही खोटे. ज्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यांनी भिडेंची माफी मागावी. अन्यथा आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू. 

म्हणून आंब्याचा दिला दाखला...
चौगुले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे एक आम्रवृक्षच आहेत. त्यांच्याकडे महामृत्युंजय मंत्र, महासंजीवनी मंत्र, महाअमृत मंत्र होता. या अमृताचे आजच्या पिढीने प्राशन केले, तर हा हिंदू समाज छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या रक्त गटाचा बनेल, असेही भिडे यांनी नाशिकच्या सभेत नमूद केले होते. यासाठी त्यांनी मोहिते यांच्या शेतातील आंब्याचे उदाहरण दिले होते. 

शेतीच नाही : बदनामीचा डाव
चौगुले म्हणाले, भिडे यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. ते बालब्रम्हचारी व संन्याशी आहेत. सांगलीत गावभागात एका कार्यकर्त्याने दिलेल्या दहा-बाय-दहाच्या खोलीत ते राहतात. अंथरुण-पांघरुणही नाही. फरशीवर झोपतात आणि धोतर अंगावर घेतात. त्यांची कुठेही मालमत्ता अथवा शेती नाही. मग त्यांची आंब्याची बाग कशी असेल? प्रसारमाध्यमांना त्यांच्याविषयी सर्व माहिती आहे. तरीही त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन खोटे वृत्त प्रसिद्ध केले. गेल्या दोन वर्षापासून समाजविघातक शक्ती भिडे यांच्या बदनामीचा डाव आखत आहेत. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत त्यांना अडकविण्यात आले. पुण्यात वारीमध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी तलवारी घेऊन घुसल्याचा आरोप करण्यात आला.

Web Title: There are no fields of mangoes - Nitin Chougule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.