खानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:52 PM2019-07-21T23:52:35+5:302019-07-21T23:52:39+5:30

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व ...

Text of Kanpur-Atapadi leaders congress | खानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ

खानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ

Next

अविनाश बाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व राष्टÑवादीची विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भले-भले देव पाण्यात घालत होते, तिथे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मात्र सध्या सर्व प्रस्थापित नेत्यांनी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडे पाठ फिरवली आहे. कॉँगे्रसकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी, तर राष्टÑवादीकडे रावसाहेब पाटील आणि हणमंतराव देशमुख यांनी तिकीट मागितले आहे.
हा विधानसभा मतदारसंघ गेली कित्येक वर्षे कॉँग्रेस आणि राष्टÑवादीकडेच होता. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी आ. अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख हे खूप प्रयत्न करीत होते. आता बाबर शिवसेनेत आहेत, तर राजेंद्रअण्णा भाजपात गेले. राष्टÑवादीचे तिकीट मिळविण्यासाठी ही मंडळी निवडणुकीअगोदरच मोर्चे, पाण्याचा प्रश्न आणि शेतकरी मेळावे घेऊन चांगलेच शक्तिप्रदर्शन करायची. आपणच कसे पक्षाशी आणि जनतेशी एकनिष्ठ आहोत, हे दाखवायची. तिकीट मिळाले की विजय पक्का, असेच तेव्हा समीकरण होते. राजकारणाच्या बदलत्या वाऱ्याची दिशा या मंडळींनी वेळीच ओळखली आहे. त्यामुळे बुडत्या जहाजात कशाला बसा, म्हणत त्यांनी पक्षांतर केल्याने, या राजकीय पक्षांची तालुक्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सत्ता असताना या पक्षांनीही आटपाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.
माजी आमदार सदाशिवराव पाटील हे कॉँग्रेसचे. पण सध्या त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी ते कॉँग्रेसकडून निवडणूक लढणार का नाही, ते ठरणार आहे. दि. ६ जुलैपर्यंत जे कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पक्षाकडे अर्ज करायचे होते. पण पाटील यांनी अर्ज केलेला नाही. सध्या ते आणि त्यांचे पुत्र आटपाडी तालुक्यातही सक्रिय झाले आहेत. ते आमदार असताना दर शुक्रवारी आटपाडी पंचायत समितीत यायचे. त्यातुलनेत गेल्या ५ वर्षात त्यांच्या तालुक्यात भेटी झाल्या नाहीत. पण सध्या तरी त्यांचे येणे-जाणे वाढले आहे. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षे रावसाहेब पाटील या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते. भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष फर्डे वक्ते आहेत. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे सख्य आहे. त्यांनी यापूर्वी अनेकवेळा पक्षाकडे तिकीट मागितले आहे. तसेच हणमंतराव देशमुख सध्या राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष आहेत.
दिघंची गटात त्यांचा दबदबा आहे. भाजपची लाट असताना त्यांनी पं. स. सदस्य निवडून आणला आहे. कॉँग्रेसकडून तिकीट मागणारे सध्या राजाराम देशमुख हे एकमेव इच्छुक आहेत. सार्वजनिक विवाह यासह अनेक सामाजिक उपक्रम ते करतात. गलाई व्यावसायिकांचे ते नेते आहेत. कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संंबंध आहेत. निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे असले तरी, ही मंडळी प्रस्थापितांशी कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

‘वंचित’ दिशा ठरविणार?
राज्यात कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि वंचित आघाडीची युती झाली, तर पुन्हा वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ जागा वाटपात कुणाला सुटणार, उर्वरित बंडखोरी करणार काय, का पाठिंबा देणार यावर, तसेच सदाशिवराव पाटील, गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरच चित्र स्पष्ट होईल.

Web Title: Text of Kanpur-Atapadi leaders congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.