swabhimani shetkari sanghatana turn violent in sangli | ऊस आंदोलन चिघळले, 'स्वाभिमानी'कडून सांगली जिल्ह्यात जाळपोळ
ऊस आंदोलन चिघळले, 'स्वाभिमानी'कडून सांगली जिल्ह्यात जाळपोळ

सांगली : ऊस दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळले आहे. गुरुवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील कारखान्याचे कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील व राजारामबापू पाटील कारखान्याचे कामेरी (ता. वाळवा) येथील विभागीय कार्यालय पेटवून दिले आहे. भडकंबे (ता. वाळवा) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पेटविल्या आहेत.            

उसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये दर मिळावा, दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी संघटनेने जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून कारखान्यांच्या व्यवस्थापनास निवेदन दिले होते.

उसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे. जोपर्यंत दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू नयेत, यासाठी संघटनेने कारखान्यांवर धडक मारली, तरीही कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. चार दिवसापूर्वी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली होती. त्यानंतर आता वसंतदादा आणि राजारामबापू पाटील कारखान्याची विभागीय कार्यालये पेटवून देऊन कारखाने बंद ठेवण्याचा एकप्रकारे इशारा दिला आहे. 


Web Title: swabhimani shetkari sanghatana turn violent in sangli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.