सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना पलूस येथे झालेल्या मारामारीच्या घटनेचे पडसाद आज उमटले. घटनेच्या निषेधार्थ आज (रविवारी) जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महायुती व विविध पक्ष, संघटनांनी या घटनेचा निषेध केला. निदर्शने, रास्ता रोकोही करण्यात आला.
पलूस : तालुक्यातील काही गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. पलूस पंचायत समितीच्या आमसभेत राजोबा यांनी, उसाच्या एफआरपीप्रमाणे दर देण्याच्या गेल्या आमसभेवेळी करण्यात आलेल्या ठरावाबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी पंचायत समितीची आमसभा आहे, त्यासंदर्भात प्रश्न विचारा, उसाचा येथे संबंध नाही, असे म्हणून सभेस उपस्थित कार्यकर्त्यांनी राजोबा यांना व्यासपीठावरून खाली खेचले. राजोबा जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. राजोबा यांना तातडीने सांगली येथील रुग्णालयात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हलविले.
या घटनेचे पडसाद पलूस, कडेगावसह जिल्ह्यात उमटले. पलूस तालुक्यातील अंकलखोप, नागठाणे, आमणापूर, बुर्ली, आंधळी आदी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावातील व्यवहार बंद ठेवून निषेध केला. काही ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली.
स्वाभिमानी संघटनेचे पलूस तालुकाध्यक्ष जयकुमार कोले, सूर्यकांत मोरे, बालेखान मुल्ला, संजय माळी, अंकुश पाटील, दशरथ पाटील, लखपती पाटील, प्रमोद पाटील यांसह इतर गावांतील कार्यकर्त्यांनी संदीप राजोबा यांच्या मारहाणीचा निषेध केला. राजोबा यांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
अंकलखोप : आज सकाळपासून अंकलखोप येथील व्यापारी वर्गाला आवाहन केल्यानंतर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला. अंकलखोपबरोबरच औदुंबर, विठ्ठलनगर, औदुंबर येथे दिवसभर शुकशुकाट होता. गावातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुकाने उघडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. डॉ. पतंगराव कदम यांच्या घरावर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने उद्या सोमवारी बंद पाळण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
आष्टा : स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेच्यावतीने प्रवासी वाहतूक बंद ठेवून निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ढोले म्हणाले की, राजोबा यांना पलूस पंचायत समितीच्या आमसभेत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासमोर काँग्रेसच्या गुंडांनी मारहाण केली. रविवारी कदम इस्लामपूरकडे जात असताना संघटनेने त्यांना काळ््या फिती दाखवून निषेध केला. राजोबा यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक केली नाही, तर जिल्हा बंद करून चक्का जाम आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष राजू बोळाज, संदीप जाधव, राजाभाऊ निकम, शरद पाटील, संतोष पाटील, महेश माने, सागर कदम, भूषण फल्ले, भाऊसाहेब नेमाणे, सुनील देशमुख, सुनील भोसले, मोहन शेडबाळे, सतीश चव्हाण, रफिक पठाण, संपत पाटील सहभागी झाले होते. दुधगाव, वडगाव, इस्लामपूर, भिलवडी, बावची, वाळवा, गोटखिंडी येथेही बंद ठेवण्यात आला. (वार्ताहर)कवठेएकंदमध्ये बंद
कवठेएकंद : मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आज गावात बंद पाळण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, शेतकरी संघटना, शेकाप अशा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गाव बंदचे आवाहन केले. एसटी स्टँड चौकामध्ये निषेध सभा घेण्यात आली. यावेळी सरपंच दीपक जाधव, दीपक घोरपडे, पं. स. सदस्य जयवंत माळी, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष अशोक खाडे, बळवंत कारंडे, राहुल शिरोटे आदी सहभागी होते.
शेतकऱ्यांसाठी दाद मागणाऱ्या राजोबा यांना पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत समर्थकांनी बेदम मारहाण केली. याबाबत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या घटनेला लगाम घालून मारहाण करणाऱ्यांना कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच दीपक जाधव यांनी केली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.