इस्लामपुरात लवकरच टेक्स्टाईल पार्क : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:31 PM2017-10-19T15:31:01+5:302017-10-19T15:46:43+5:30

वस्त्रोद्योग वाढीसाठी राज्य मंत्रिमंडळाने एका महिन्यात इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क करण्यासह वस्त्रोद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त शिफारशींना मंजुरी दिली आहे. इस्लामपूर येथेही टेक्स्टाईल पार्क करण्यासाठीही शासनाची मंजुरी असून, जागेचाही आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Soon Textile Park in Islampur: Sadabhau Khot | इस्लामपुरात लवकरच टेक्स्टाईल पार्क : सदाभाऊ खोत

इस्लामपुरात लवकरच टेक्स्टाईल पार्क : सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्देइस्लामपूर येथे शासनाकडून जागेचा शोध सुरूजागा निश्चित झाल्यानंतर लगेच कामही सुरू होणारकापूस उत्पादक जिल्ह्यात जादा सवलती व अनुदान देण्यास शासन मान्यताकामगारांच्या संख्येत वाढ करण्याच्या शिफारशी मान्य

सांगली , दि. १९ : वस्त्रोद्योग वाढीसाठी राज्य मंत्रिमंडळाने एका महिन्यात इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क करण्यासह वस्त्रोद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त शिफारशींना मंजुरी दिली आहे. तसेच नवीन उद्योग घटकांना २५ ते ३५ टक्के भांडवली अनुदान देण्याचाही शासनाने निर्णय घेतला आहे.

इस्लामपूर येथेही टेक्स्टाईल पार्क करण्यासाठीही शासनाची मंजुरी असून, जागेचाही आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना दिली.


ते पुढे म्हणाले की, इस्लामपूर शहर महामार्गाच्या जवळ आहे. वस्त्रोद्योग वाढीसाठी पोषक वातावरणही आहे. कच्चा मालही इस्लामपूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर उपलब्ध होणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करूनच इस्लामपूर येथे टेक्स्टाईल पार्क उभा करण्याचे नियोजन आहे. शासनाकडून जागेचा शोध चालू आहे.

जागा निश्चित झाल्यानंतर लगेच कामही सुरू होणार आहे. वस्त्रोद्योग वाढीसाठी उपाययोजना सुचविण्यासाठी सर्व खात्यांच्या उपसचिवांची एक समिती आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. या समितीने अभ्यास करून अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी सरकारकडे सादर केल्या आहेत. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

कापूस उत्पादक जिल्ह्यात जादा सवलती व अनुदान देण्यास आणि यंत्रमाग उद्योगाला स्वतंत्र वर्गवारी करून सवलतीच्या दरात वीज पुरवठा, फॅक्टरी अ‍ॅक्ट कायद्यातील कामगारांच्या संख्येत वाढ करण्याच्या शिफारशींना शासनाने मान्यता दिली आहे. याचबरोबर कापूस उत्पादक क्षेत्रात टेक्स्टाईल पार्क उभारण्यासही मंजुरी दिली आहे.

आॅटोलूम, निटिंग, गारमेंट, जिनिंग, प्रोसेसिंग, टेक्निकल टेक्स्टाईल आणि कॉम्पोझिट युनिट या सर्व प्रकारच्या उद्योगाला उद्योग विभागाच्या धर्तीवर २५ ते ३५ टक्के भांडवली अनुदान देणे, संपूर्ण प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी सुलभ पध्दतीने वस्त्रोद्योगातील उद्योग घटकांना कर्जाच्या मर्यादेत व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान योजना लागू करण्याचाही शासनाने निर्णय घेतला आहे. या सवलतीचा सांगली जिल्ह्यातील वस्त्रोद्योग आणि व्यापाºयांना फायदा व्हावा, म्हणूनच इस्लामपूर येथे टेक्स्टाईल पार्क करण्यात येणार आहे, असेही खोत यांनी सांगितले.

सदाभाऊही काढणार दूध संघ

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी दूध संघाला शह देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही फिनिक्स दूध संघ काढण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामपूरमध्ये या दूध संघाच्या शेअरची विक्री दि. १९ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Web Title: Soon Textile Park in Islampur: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.