Shalalkar solved the cats with the help of dogs, treated as family members | शिराळकरांनी सोडवले नागाला कुत्र्यांच्या तावडीतून, घरातील सदस्यांप्रमाणे केले उपचार

ठळक मुद्देशिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचविले चार ते पाच कुत्र्यांनी चढवला हल्ला, नाग जखमीशिराळकरांनी वाचविले नागाचे अनेकदा प्राण

 विकास शहा

शिराळा, दि. ५ : शिराळकर आणि नाग यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. मंगळवारीही शिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचवून घरातीलच सदस्याप्रमाणेच नागाची त्याची काळजी घेतली.

मंगळवारी सकाळी एका नागावर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला चढवला, त्यात नाग जखमी झाला. शिराळ्यातील युवकांनी हा प्रकार केवळ पाहिला आणि बघ्याची भूमिका न घेता अथवा या प्रकाराचे शुटिंग करत न बसता या कुत्र्यांना हाकलले आणि या जखमी नागावर त्वरित शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

आज सकाळी ९ च्या दरम्यान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळील शेतात एका नागावर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला चढवला, यातील काही कुत्री नागाचा चावा घेत होती, तर काही कुत्री पंजाने नागावर हल्ला करत होते.

ही घटना शेताकडे जाणाऱ्या अभिजित यादव, विक्रांत पवार, शिवकुमार आवटे, आकाश सपाटे, आदिनाथ निकम, रोहन म्हेत्रे, नितीन कुरणे या युवकांनी पहिली. त्यांनी या कुत्र्यांना तेथून हाकलण्याचा प्रयत्न केला, पण या कुत्र्यांनी या युवकांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र जीव धोक्यात घालून या युवकांनी शेवटी नागाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.

 कुत्र्यांच्या हल्ल्यात नागाच्या शेपटी, फण्याजवळ, तसेच अंगावर सहा ते सात ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या होत्या. या युवकांनी या नागास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले तसेच वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक याना कळवले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. बी. गावडे , एम.एस. चव्हाण, सुशांत शेनेकर यांनी या जखमी नागावर उपचार केले.

यावेळी वन कर्मचारी सचिन पाटील, बाबा गायकवाड यांनी उपचारानंतर नागाला ताब्यात घेतले. या नागावर अजून चार-पाच दिवस उपचार करावे लागणार आहेत. त्यामुळे या नागास खास पेटीत ठेवण्यात आले आहे. ही बातमी समजताच नागरिकांनी जखमी नागाला पाहण्यासाठी या दवाखान्यात मोठी गर्दी केली.

शिराळकरांनी वाचविले नागाचे अनेकदा प्राण

यापूर्वीही शिराळा येथील नागरिकांनी कूपनलिकेमध्ये अडकलेल्या नागाला सोडविले आहे, तसेच कित्येक वेळा शेतातील कामे करताना नांगरात अडकून जखमी झालेल्या नागांचे प्राणही वाचवले आहेत. येथील नागरिकांना अनेकदा सर्पदंश झाला आहे, पण कोणीही, कधीही नागाला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही.

 


या नागाच्या अंगावर सहा सात ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या आहेत, त्यामुळे या जखमा पूर्ण बऱ्या होणे गरजेच्या आहेत अन्यथा या जखमांना मुंग्या लागू शकतात. यामुळे या नागाचा मृत्यू होऊ शकतो. या जखमा पूर्ण बऱ्या झाल्यानंतर नागाला सोडून द्यावे लागेल
      - डॉ. व्ही .बी. गावडे
 पशुवैद्यकीय अधिकारी, शिराळायुवकांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून नागांचे प्राण वाचवून एक चांगले काम केले आहे. त्यांनी एक वन्य जीव वाचवला आहे. जखमा पूर्ण बऱ्या होईपर्यंत या नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले जातील. त्यानंतर पूर्ण बरा झाल्यावर नागास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल .
       तानाजीराव मुळीक,
वनक्षेत्रपाल, शिराळा