सांगली, मिरजेत सात बसेस फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:24 AM2018-01-03T00:24:09+5:302018-01-03T00:25:10+5:30

Seven buses in Sangli, Miraj | सांगली, मिरजेत सात बसेस फोडल्या

सांगली, मिरजेत सात बसेस फोडल्या

Next


सांगली/मिरज : कोरेगाव-भीमा (जि. पुणे) येथे दोन गटात झालेल्या मारामारीचे पडसाद मंगळवारी सांगली, मिरजेत उमटले. मिरजेत सहा एसटी बसेसवर, तर सांगलीत एका खासगी आराम बसवर दगडफेक झाली. दलित महासंघाने या घटनेचा निषेध करीत सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत ३ जानेवारीच्या बंदला पाठिंबा देऊन बंद शांततेत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी मुख्य बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दोषीवर कडक कारवाई करावी, अन्यथा महाराष्टÑभर आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी दिला. उत्तम कांबळे, सतीश मोहिते यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढविली. शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सायंकाळी शास्त्रीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. दोषीवर शासनाने तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. बुधवारच्या ‘महाराष्टÑ बंद’ला पाठिंबा देऊन हा बंद शांततेत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी अकरा वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी जमून, जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचा निर्णय झाला.
बैठकीस नगरसेवक बाळू गोंधळी, किरणराज कांबळे, नितीन कांबळे, सुरेश दुधगावकर, शंकर माने, प्रियानंद कांबळे, प्रा. रवींद्र ढाले, गॅब्रीयल तिवडे, रोहित शिवशरण, अमोल वेटम, असिफ बावा, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील उपस्थित होते.
दरम्यान, शसकीय रुग्णालय चौकात दुपारी दोन वाजता कोल्हापूर-मिरज या खासगी आराम बसवर (क्र. एमएच ४८-के-७८७६) अज्ञातांनी दगडफेक करुन काचा फोडल्या. यामध्ये पाच हजाराचे नुकसान झाले. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा रात्री उशिरापर्यंत शहरात फिरुन परिस्थितीचा आढावा घेत होते. सर्व पोलिस ठाण्यांतील तसेच पोलिस मुख्यालयातील गुप्त वार्ता विभागातील पोलिसही शहरात फिरुन परिस्थितीची माहिती घेऊन वरिष्ठांना कळवत होते. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन रात्री उशिरापर्यंत पोलिस मुख्यालयात सुरु होते.

मिरजेत सहा बसेसवर दगडफेक
सोमवारी मध्यरात्री मिरज बसस्थानकात चार ते पाच अज्ञात तरुणांनी प्रवेश करुन तिथे उभ्या असलेल्या बसेसवर (क्र. एमएच १४ बीटी १०८७, एमएच १४ बीटी १०२१, एमएच ४० ५०७०, एमएच १२ बीटी ९७८) दगडफेक केली. बस स्थानकाबाहेर संतोषवाडी मुक्कामी जाणाºया बसवर (क्र. एमएच १२ ईएफ ६४९६) दगडफेक करुन काचा फोडल्या. याबाबत एसटी नियंत्रक शिवाजी खांडेकर यांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली.
या घटनेनंतर बसस्थानक ते शास्त्री चौकदरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही दुपारी चार वाजता उत्तमनगर येथे सांगली-चिंचणी एसटी बसवर (एमएच १४ बीसी ४६१२) मागील बाजूने अज्ञातांनी दगडफेक करुन काचा फोडल्या. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीच्या घटनेनंतरही एसटी वाहतूक सुरळीत होती.
अफवा पसरविणाºयांची गय नाही : सुहेल शर्मा
कोरेगाव-भीमा घटनेसंदर्भात सोशल मीडियावरुन समाजभावना भडकविणाºया पोस्ट टाकण्याचा किंवा अफवा पसरविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी दिला आहे.
भिडे गुरुजींचा संबंध नाही : शिवप्रतिष्ठान
सांगली : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजींचे नाव जाणीवपूर्वक राजकीय षड्यंत्राचा भाग म्हणून गोवण्यात आले आहे. या प्रकरणाशी गुरुजींचा कोणताही संबंध नाही, असे संस्थेचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

Web Title: Seven buses in Sangli, Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली