Sangliyat bungalow; Cash Lamp with Jewelery | सांगलीत बंगला फोडला; दागिन्यांसह रोकड लंपास
सांगलीत बंगला फोडला; दागिन्यांसह रोकड लंपास

ठळक मुद्देएलईडीही पळविला : चोरट्यांचे आव्हान

सांगली : विजयनगर येथील सिद्धान्ना नागाप्पा म्हेत्रे (वय ५४) यांचा बंगला फोडून चोरट्यांनी तीन तोळ्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, रोकड व एलईडी असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

सिद्धान्ना म्हेत्रे यांचा विजयनगरमध्ये पश्चिमेला सिद्धिविनायक सोसायटीमध्ये ‘श्रीप्रभा’ हा बंगला आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता म्हेत्रे कुटुंबीय परगावी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाटाचे सुरक्षा लॉकही तोडले. यामधील सोन्याचे कानातील झुबे, टॉप्स्, अंगठी, मंगळसूत्र असे तीन तोळे दागिने, अर्धा किलो चांदीची भांडी, १६ हजाराची रोकड लंपास केली. चांदीमध्ये आरतीचे ताट, वाटी, लक्ष्मीची मूर्ती आहे. चोरट्यांनी हॉलमधील भिंतीवरील एलईडीही पळविला.

म्हेत्रे कुटुंबीय रविवारी सकाळी साडेसात वाजता गावाहून परतले, त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा म्हेत्रे यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title: Sangliyat bungalow; Cash Lamp with Jewelery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.