सांगलीत बंदला हिंसक वळण, दहा ते बारा गाड्या, आठ दुकाने फोडली, मारुती रोडवर दोन गटात दगडफेक, पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 4:57pm

कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. सांगलीत ठिकठिकाणी दहा ते बारा गाड्या फोडण्यात आल्या. गणपती मंदिरासमोरील व्यापारी पेठेतील आठ दुकानांवर दगडफेक करण्यात आली.

सांगली : कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. सांगलीत ठिकठिकाणी दहा ते बारा गाड्या फोडण्यात आल्या. गणपती मंदिरासमोरील व्यापारी पेठेतील आठ दुकानांवर दगडफेक करण्यात आली.

मारुती रस्त्यावर दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर केल्याने दोन तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ सांगली बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच सांगलीतील सर्व व्यवहार बंद होते. सकाळी सातपूर्वी स्टेशन चौकात एका बसवर दगडफेक करण्यात आली.

सकाळी अकरा वाजता बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठा जमाव जमा झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शांततेने निवेदन देण्यात येणार होते; पण यातील एक जमाव मोर्चाद्वारे मारुती चौकाच्या दिशेने गेला. या जमावामुळे बंदला हिंसक वळण लागले.

मारुती चौकात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचा फलक हटविण्याची मागणी जमावाने केली. तसेच जमाव गावभागात शिरण्याच्या प्रयत्नात होता; पण पोलिसांनी जमावाला गावभागात सोडले नाही. यानंतर त्या डिजिटल फलकावर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावाला हटविण्याचा प्रयत्न केला. त्यातून पोलिस व कार्यकर्त्यांत मोठी वादावादी झाली. जमावाने जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव वाढला.

काहीजणांनी फलकाच्या दिशेने दगड भिरकाविण्यास सुरुवात करताच पोलिसांनी जमावाला अडविण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यातून कार्यकर्त्यांची पळापळ झाली. अखेर पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला पाचारण केले. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने हा फलक हटविला, पण तो जप्त करण्यास शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. फलक काढताच जमाव हरभट रोडच्या दिशेने गेला. त्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्याच जागी नवीन फलक लावला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी एका गटाने गणपती मंदिरासमोरील दुकाने फोडली. या दुकानातील साहित्य बाहेर काढून त्याची नासधूस केली. दुकानचालकांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारामुळे आणखी तणाव वाढला. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील हे फौजफाट्यासह गणपती मंदिराकडे धावले. तोपर्यंत तेथील जमाव निघून गेला होता. दुकानचालकांसह शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते गणपती मंदिरासमोर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी उपअधीक्षक बोराटे यांना समाजकंटकांवर कारवाईची जोरदार मागणी केली. एक जमाव झाशी चौकात थांबून होता. पोलिसांनी त्या जमावाच्या दिशेने धाव घेतल्याने तो पांगला. त्यानंतर जमावाने राजवाडा चौकात ठिय्या मारला. याठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. संभाजीराव भिडे यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. राजवाडा चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर हा जमाव हरभट रोडच्या दिशेने गेला.

हरभट रस्त्यावरील सीमा ड्रेसेस या दुकानावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, मारुती चौकात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते हरभट रोडच्या दिशेने येताच दुसऱ्या जमावाने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दोन्ही गटांना अडवून धरले होते. त्यातून मारुती रोडवर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. दगडफेकीनंतर मात्र पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत जमावाला पळवून लावले. कार्यकर्त्यांचा पाठलाग करून लाठीचा प्रसादही दिला. पोलिसांनी गणपती पेठ, हरभट रोड, राजवाडा चौक, महापालिका चौकात हुल्लडबाजी करणाऱ्यांना हुसकावून लावले. त्यामुळे सांगलीतील परिस्थिती बऱ्याचअंशी नियंत्रणात आली. वाहने, एटीएम फोडले सांगलीत ठिकठिकाणी आंदोलकांनी दहा ते बारा वाहने फोडली. यात भाजपचे माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांच्या वाहनाचाही समावेश होता. पाटील यांचे वाहन स्टेशन चौकातील पार्किंगमध्ये होते.

हुल्लडबाजांनी त्यांच्या वाहनासह तेथील चार वाहनांच्या काचा फोडल्या. बापट बाल मंदिराजवळ पाच वाहनांवर काठ्या व दगड मारले. आझाद चौकातही एक गाडी फोडण्यात आली. बुरुड गल्लीतील युनियन बँकेच्या एटीएमवरही दगडफेक करण्यात आली. यात एटीएमच्या काचा फुटल्या. एसपी, गाडगीळ मारुती चौकात मारुती चौकात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. या जमावाला शांत करण्यासाठी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा स्वत: रस्त्यावर उतरले होते. शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी मराठा व दलित समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत.

भिडे गुरुजींच्या फलकावर दगडफेक करण्यात आली. चौकातील सीसी टीव्हीत समाजकंटक कैद झाले आहेत. त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. त्यासाठी पोलिसांना वेळ देत आहोत. समाजकंटकांकडून नुकसानभरपाई वसूल करावी. प्रशासनाने कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू, असा इशारा दिला. घटनाक्रम  

 1. सकाळी अकरा वाजता बसस्थानक परिसरात मोठा जमाव
 2. जमावातील एका गटाची मारुती चौकाच्या दिशेने धाव
 3. मारुती चौकातून गावभागात शिरण्याचा प्रयत्न
 4. पोलिसांनी जमावाला अडविले
 5. जमावाकडून फलकावर दगडफेक, घोषणाबाजी
 6. फलक हटविताच जमाव हरभट रोडच्या दिशेने रवाना
 7. राजवाडा चौकात जमावाकडून रास्ता रोका, ठिय्या आंदोलन
 8. गणपती मंदिरासमोरील सहा ते सात दुकाने फोडली
 9. दुकानातील साहित्याची नासधूस
 10. मारुती चौकात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमा
 11. मारुती रोडवर दोन्ही गट आमनेसामने, एकमेकांवर दगडफेक
 12. पोलिसांचा बळाचा वापर
 13. चौका-चौकात राज्य राखीव दलासह पोलिसांचा मोठा फौजफाटा

बसच्या एक हजार फेऱ्या रद्द सकाळी सातपूर्वी स्टेशन चौकात एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली, तर मिरजेत २ बसेसवर दगडफेक करण्यात आली. यात एसटीचे ८० हजारांचे नुकसान झाले. त्यानंतर एसटी महामंडळाने बससेवा पूर्णपणे बंद केली. दुपारपर्यंत १०१० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

यात सांगलीतून जाणाऱ्या सर्व ५२१ फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर सांगलीत येणाऱ्या ५१६ पैकी ४८९ फेऱ्या रद्द केल्या. सायंकाळपर्यंत बससेवा सुरू झालेली नव्हती. केवळ मुक्काम बसेस वगळता एकही फेरी दिवसभरात झाली नाही.

सांगलीत बसस्थानक परिसरातही मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. सर्व बस महामंडळाच्या आवारात लावण्यात आल्या होत्या. बसच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. बस बंद असली तरी वडाप सेवा मात्र सुरू होती.

संबंधित

मृतदेहाच्या गोंधळामागे कोण?
सांगली जिल्ह्यात योग चळवळीच्या रुंदावल्या कक्षा...अनेक संस्थांचा पुढाकार :आशादायी चित्र
International Yoga Day बालगावच्या ऐतिहासिक योग शिबिराची तयारी अंतिम टप्पात 
सांगली :  माहूलीजवळ अपघातात एकाच कुटूंबातील तीन ठार
सांगली : ​वऱ्हाडाचा टेम्पो नाल्यात कोसळला, सुरुलजवळ अपघात : पंधराजण जखमी; पाचजण गंभीर

सांगली कडून आणखी

सांगलीमध्ये ‘सिव्हिल’च्या इमारतीवरून, रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
सांगलीत होणार २०० कोटींचे सहकारी रुग्णालय
मृतदेहाच्या गोंधळामागे कोण?
सांगली जिल्ह्यात सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम, एशियन बुकसह तीन संस्थांकडे नोंद
सांगली जिल्ह्यात योग चळवळीच्या रुंदावल्या कक्षा...अनेक संस्थांचा पुढाकार :आशादायी चित्र

आणखी वाचा