सांगलीत नव वर्षाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:16 PM2017-12-31T23:16:32+5:302017-12-31T23:17:33+5:30

Sangli's New Year Celebration | सांगलीत नव वर्षाचा जल्लोष

सांगलीत नव वर्षाचा जल्लोष

Next


सांगली : रविवारी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात उत्साहाला उधाण आले होते. नियोजित मेजवानी व कार्यक्रमामुळे आनंद द्विगुणित होत होता, तर दुसरीकडे सरत्या वर्षाच्या शेवटच्यादिवशी रविवार आल्याने अनेकांचे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन यशस्वी झाले. नवीन वर्षाचे स्वागत करताना जल्लोष, हुल्लडबाजीला फाटा देत ‘ दारू नको, दूध प्या’ यासारखे उपक्रम अनेक सामाजिक संघटनांनी राबविले.
सोमवारपासून सुरु होत असलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. रविवारी दुपारपासूनच अनेक ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीचे नियोजन सुरु होते. शाकाहारी व मांसाहारी मेजवानीचे बेत आखण्यात येत होते. हॉटेल्स, ढाबेही मद्य व जेवण विक्रीसाठी सज्ज होते. हॉटेल्स, ढाब्यावर विद्युत रोषणाई केली होती. पोलिसांनी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’बाबत कडक पावले उचलल्याने तळीरामांनी हुल्लडबाजी थांबल्याचे दिसून आले. रात्री नऊनंतर शहरातील प्रमुख चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता. वाहनधारकांची तपासणी केली जात होती. अनेकांनी शहराबाहेर निवांत ठिकाणी जाऊन घरातून तयार केलेल्या पदार्थांवर ताव मारत ‘सेलिब्रेशन’ केले.
वर्षाचा शेवटचा दिवस रविवार आल्याने अनेकांनी ‘पार्टी’चे नियोजन केले होते. काहीजणांनी घरात गोडधोड व शाकाहारी पदार्थांची मेजवानी करत नवीन वर्षाचे स्वागत केले. त्यामुळे श्रीखंड, बासुंदीसह पनीर व इतर शाकाहारी पदार्थ खरेदीसाठी गर्दी होती.
रात्री बाराच्या ठोक्याला तरुणाईने फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत केले. रस्त्यावरही नववर्षाच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.

Web Title: Sangli's New Year Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली