सांगलीला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार : मनोज सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:17 AM2018-02-24T01:17:09+5:302018-02-24T01:17:09+5:30

 Sangli will be the center of job creation: Manoj Sinha | सांगलीला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार : मनोज सिन्हा

सांगलीला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार : मनोज सिन्हा

Next
ठळक मुद्दे‘सांगली फर्स्ट’ प्रदर्शनाचे उद्घाटन; उद्योगवाढीसाठी सरकारतर्फे प्रयत्न; छोट्या शहरांच्या विकासालाही प्राधान्य

सांगली : औद्योगिक दृष्ट्या सक्षम असणाºया शहरांचा गतीने विकास होत असून, मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. कला, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात नाव असलेल्या सांगलीतही उद्योगवाढीसाठी सरकारतर्फे प्रयत्न होणार असून, पुण्याप्रमाणेच सांगलीलाही रोजगार निर्मितीचे केंद्र बनविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय दूरसंचार, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत केले.
येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित ‘सांगली फर्स्ट’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. संजयकाका पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा पुढे म्हणाले की, मोठ्या शहरांच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. यापुढे छोट्या व उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण असलेल्या शहरांचा विकास विचाराधीन आहे. गेल्या चार वर्षांत कारभारात झालेल्या सुधारणेमुळे विकासाला गती मिळत आहे. यामधूनच सांगलीत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध केल्या जातील.

राज्याला चारवेळा मुख्यमंत्री, क्रीडा, कला, उद्योगक्षेत्रातील अनेक रत्ने सांगलीच्या भूमीने दिली आहेत. सिंचन योजना आणि कृषी क्षेत्रातील उत्पादनामुळे संपूर्ण देशभरात सांगलीची वेगळी ओळख आहे. त्यामुळेच रोजगार देण्याच्याबाबतीत सांगली पुणे कसे बनेल यासाठी प्रयत्न करणार आहे. केंद्र सरकार ग्रामीण भागात वेगवान इंटरनेट सुविधा देण्यास कटिबध्द असून, सांगलीत पुढील महिन्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून, पोस्टाची पेमेंट बॅँकही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्य सरकार मॅग्नेटिक महाराष्टÑाच्या माध्यमातून जगभरातील उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असून, यातच ‘सांगली फर्स्ट’सारखी वेगळी कल्पना उद्योगवाढीला प्रोत्साहन देणारी आहे. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच; पण तरुणांना उद्यमशील बनविण्यासही प्राधान्य द्यायला हवे. केवळ बॅँकांची कर्जे देऊन चालणार नसून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य सरकारतर्फे करण्यात येईल. मराठा आरक्षण मिळणारच आहे; पण तोपर्यंत तरुणांना सहाय्य करण्यासाठी ३ लाख ८ हजार कोटींची तरतूद करत मोफत कोर्सेस सुरू करण्यात आली आहेत. दोन कोटीपर्यंतच्या उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, समृध्द वारसा असलेल्या सांगली जिल्ह्याला आता औद्योगिकदृष्ट्या पुढे न्यायचे आहे. यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सांगली, मिरजेतील वैद्यकीय सेवेला शंभर वर्षांचा इतिहास असून, द्राक्ष, बेदाण्याच्या बाबतीतही संपूर्ण जगभरात सांगली जिल्ह्याचे नाव आहे. मिरज रेल्वेस्थानकाचा विकास आणि रेल्वेचा छोटा उद्योग जिल्ह्यात आल्यास प्रगती आणखी वेगाने होणार असून, सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना एकत्र घेऊनच जिल्ह्याचा विकास साधला जाणार आहे.

सांगली फर्स्ट नियोजन समितीचे अध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी प्रास्ताविक केले; तर प्रदर्शनाची संकल्पना गोपाळराजे पटवर्धन यांनी मांडली. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, ‘क्रीडाई’चे अध्यक्ष विकास लागू, प्रभाताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आज विविध विषयांवर चर्चासत्रे
‘सांगली फर्स्ट’ प्रदर्शनाच्या शनिवारी दुसºयादिवशी सकाळच्या सत्रात सकाळी साडेनऊ वाजता ‘मेक इन सांगली’तील संधी विषयावरील चर्चासत्रात आॅटोमाबाईल क्षेत्र, विशेषत: इलेक्ट्रॉनिक वाहने आणि त्याचे भविष्य याविषयावर चर्चा होणार आहे. भारतातील गुंतवणूक व त्याचे नियोजन विषयावर साडेअकरा वाजता चर्चासत्र होणार आहे. दुपारच्या सत्रात ‘आधुनिक शेती’ विषयावर के. बी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ‘महिलांचे योगदान’ या विषयावर श्वेता शालिनी मार्गदर्शन करतील. सायंकाळी सांगलीत ‘रियल इस्टेट क्षेत्रातील संधी’ विषयावर चर्चा होणार आहे.
तीन दिवस प्रदर्शन
तीन दिवस चालणाºया या प्रदर्शनात व्यवसायविषयक, प्रॉपर्टीविषयक, प्रगत कृषी तंत्र व शेतमाल साठवणूक व प्रक्रियेविषयक माहिती देणारे स्टॉल्स आहेत. दीडशेहून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालने यात असून ‘इन्व्हेस्ट इन सांगली’ कल्पनेला बळ देणारे प्रदर्शन ठरणार आहे.

संजयकाका देशातील कार्यक्षम खासदारांत
केंद्रीय राज्यमंत्री सिन्हा म्हणाले की, देशातील कार्यक्षम खासदारांमध्ये संजयकाकांचा समावेश होतो. संसदेच्या अधिवेशनात शून्य प्रहर असो अथवा इतरवेळी काका केवळ सांगलीच्या विकासाचाच मुद्दा मांडत असतात. अगदी रस्त्यात भेटले तरी सांगलीसाठी काही तरी मागत असतात. उद्या (शनिवारी) बार्सिलोनाला जाणार असलो तरी आज सांगलीला आलो, कारण काकांचा आग्रह मोडता आला नाही.

Web Title:  Sangli will be the center of job creation: Manoj Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.