सांगलीत वाहतुकीचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:51 AM2018-04-25T00:51:15+5:302018-04-25T00:51:15+5:30

The Sangli Traffic Clash | सांगलीत वाहतुकीचा खेळखंडोबा

सांगलीत वाहतुकीचा खेळखंडोबा

Next

शीतल पाटील/सचिन लाड।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील अरुंद रस्ते, वाहन पार्किंगचा अभाव, फूटपाथवर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षांचे आणि वडाप चालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे सांगलीत वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. सातत्याने कुठे-ना-कुठे लहान-मोठे अपघात होतच आहेत. शाळकरी मुले व पादचाऱ्यांना तर जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे.
गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पण रस्त्यांची लांबी-रुंदी वाढलेली नाही. वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरु असतात, पण त्यांना महापालिका प्रशासनाची कोणतीही मदत मिळत नाही. परिणामी वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत आहे. वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आराखडा बनवून तो महापालिकेला सादर केला होता. पण महापालिकेने त्यावर कोणताही विचार केला नाही. परिणामी हा आराखडा धूळ खात पडून आहे. महापालिकेत व पोलीस दलात अधिकारी येतात आणि बदली होऊन जातात. काही दिवस वाहतुकीला शिस्त लावण्याची चर्चा होते. बैठका घेतल्या जातात. प्रस्ताव पाठविण्याबाबत कागदपत्रे रंगविली जातात. मात्र प्रत्यक्षात पुढे काहीच होत नाही.
सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात पार्किंगसाठी २९ जागांवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जागांचा पार्किंगसाठी वापर केला जातो. इतर जागा महापालिकेने ताब्यातच घेतलेल्या नाहीत. भाजी मंडईचे काही जागांवर आरक्षण आहे. पण शहरात नवीन भाजी मंडई उभारण्याऐवजी रस्त्यावरच बाजार भरविण्यात महापालिका व नगरसेवकांना अधिक रस आहे. प्रत्येक दिवशी एका मोठ्या रस्त्यावर बाजार भरलेला असतो. कापडपेठ, सह्याद्रीनगर, चांदणी चौक, विश्रामबाग गणपती मंदिर या परिसरात मोठा बाजार असतो. त्यामुळे दिवसभर वाहतुकीची कोंडी झालेली असते. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी यासंदर्भात बैठक घेऊनही, वाहतुकीच्या कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत.
रिंगरोड बासनात
कोल्हापूर, इस्लामपूर, पलूस, तासगाव, मिरज या चारही बाजूने सांगलीत वाहनांची ये-जा सुरू असते. बहुतांश वाहने शहरातून बाहेर जात असतात. सांगलीतून थेट बाहेर जाणाºया वाहनांसाठी रिंगरोडची गरज आहे. शास्त्री चौकातून सिद्धार्थनगर परिसर, टिळक चौक, शेरीनालामार्गे बायपास रस्त्यावर प्रस्तावित रिंगरोड आहे. पण त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. विजयनगर चौकातून गव्हर्न्मेंट कॉलनीमार्गे थेट कोल्हापूर रस्ता-हरिपूरपर्यंत ८० फुटी रस्ता डीपीमध्ये आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात असे कित्येक रस्ते प्रस्तावित आहेत. पण या रस्त्यांच्या निर्मितीचे भाग्य आजअखेर शहराला लाभलेले नाही.
या प्रमुख मार्गांवर होतेय कोंडी...
कॉॅलेज कॉर्नर ते आपटा पोलीस चौकी, तानाजी चौक ते कर्नाळ पोलीस चौकी, कापडपेठ, हरभट रस्ता, टिळक चौक, मुख्य बसस्थानक परिसर, आंबेडकर रस्ता, कर्मवीर चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक, गणपती पेठ, काँग्रेस भवन ते राम मंदिर चौक या प्रमुख ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. सकाळी दहा ते बारा व सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत प्रामुख्याने वाहतुकीची कोंडी होते. पादचाºयांना रस्ताही ओलांडता येत नाही. चौकात असलेले वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असतात, पण अनेकदा बेशिस्त वाहनचालकांमुळे त्यांच्या नियोजनावर पाणी पडते. त्याचा परिणाम वाहतूक कोंडी वाढण्यावर होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू असला तरी, त्यात अद्याप यश आलेले नाही. कठोर पावले उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अन्यथा वाहतूक कोंडीचा प्रश्न भविष्यात आणखी गंभीर होऊ शकतो.
ठराविक वेळेत गर्दी
सकाळी दहानंतर शहरातील वाहतूक वाढते. अकरा ते बारा व सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. शाळकरी मुलांची शाळेला जाण्याची लगबग असते. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनेही याच वेळेत धावतात. याशिवाय नोकरदार मंडळी, ग्रामीण भागातून फळे-भाजीपाला विक्रीस आलेल्या शेतकºयांची गर्दी होते. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात सातत्याने रुग्णवाहिका ये-जा करीत असतात. वाहतूक कोंडीचा या रुग्णवाहिकांना फटका बसत आहे.
फेरीवाल्यांचा बेशिस्तपणा...
सांगलीतील बहुतांश रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसते. विशेषत: सायंकाळी सहानंतर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांचे हातगाडे लागलेले असतात. फूटपाथही फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. सांगलीच्या पोलीस स्टेशनलगत फेरीवाल्यांनी जागा काबीज केली आहे. त्यामुळे पलूस, इस्लामपूरकडे जाणाºया वाहनांना अडथळा होतो. राममंदिर चौकात नव्याने हातगाडे लागले आहेत. महापालिका ते मुख्य बसस्थानक, शिवाजी पुतळा परिसर, मारुती रोड, हरभट रोड, गणपती पेठ, पटेल चौक, कापडपेठ, राणी सरस्वती कन्या शाळेचा परिसर, बुरुड गल्ली, आमराई परिसर, कॉलेज कॉर्नर, राममंदिर, सिव्हिल हॉस्पिटल रस्ता, आंबेडकर रोड या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसते. झुलेलाल चौकातून शंभरफुटीकडे जाणाºया रस्त्यावरच खोक्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथील खोकीधारकांनी निम्मा रस्ता व्यापलेला असतो. महापालिका प्रशासन फेरीवाल्यांवर कारवाईचे धाडस दाखवित नसल्याने त्यांचा बेशिस्तपणा वाढला आहे. त्यात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी रखडली आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांची प्रवासी मिळविण्यासाठी स्पर्धा
वडाप, रिक्षा, जीप, टॅक्सी-मॅक्सी कॅब या वाहनांचे ‘वडाप’ सुसाट सुरु आहे. ठरवून दिलेल्या थांब्याशिवाय ते कुठेही वाहन थांबवून प्रवासी घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सध्या शहरात चार हजाराहून अधिक रिक्षाचालक आहेत. अधिकृत रिक्षा थांबे वाढविण्याची गरज आहे. डिझेल रिक्षा चालक तर बसस्थानक, राजवाडा चौक, शहर पोलीस ठाणे, स्टेशन चौक, काँग्रेस भवन, सिव्हिल चौक या मार्गावर कुठेही वाहने थांबवून प्रवासी घेतात. यासाठी त्यांची स्पर्धा लागलेली असते. त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी होत असूनही कार्यवाही होत नाही. वाहतूक पोलीस चौकात दिसला, तर थोडे नियंत्रण राहते, अन्यथा नाही.

Web Title: The Sangli Traffic Clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.