सांगली : तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:32 PM2018-07-02T16:32:55+5:302018-07-02T16:38:39+5:30

वाढते तापमान माणसाला विनाशाकडे नेत आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी तसेच माणसाला शुद्ध हवा, भरपूर पाणी उपलब्ध होण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही. 50 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेतून संपूर्ण मानव जातीला वृक्षलागवडीचा संदेश मिळाला असून, जलयुक्त शिवार योजनेनंतर ही मोहीम लोकचळवळ बनली आहे, हे या उपक्रमाचे यश आहे. यातून पुढील वर्षापर्यंत राज्यात 50 कोटी वृक्षलागवड झालेली असेल, असा विश्वास राज्याचे कृषि, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

Sangli: There is no alternative to tree plantation to prevent warming: Sadabhau Khot | सांगली : तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही : सदाभाऊ खोत

सांगली : तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही : सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्दे तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही : सदाभाऊ खोत 50 कोटी वृक्षलागवड मोहिम, दंडोबा डोंगरावर उत्साहात वृक्षारोपण

सांगली : वाढते तापमान माणसाला विनाशाकडे नेत आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी तसेच माणसाला शुद्ध हवा, भरपूर पाणी उपलब्ध होण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही. 50 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेतून संपूर्ण मानव जातीला वृक्षलागवडीचा संदेश मिळाला असून, जलयुक्त शिवार योजनेनंतर ही मोहीम लोकचळवळ बनली आहे, हे या उपक्रमाचे यश आहे. यातून पुढील वर्षापर्यंत राज्यात 50 कोटी वृक्षलागवड झालेली असेल, असा विश्वास राज्याचे कृषि, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.


सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर, भोसे येथे जुलै 2018 मध्ये 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारतसिंह हाडा, सह्याद्रि व्याघ्र प्रकल्प (राखीव) च्या उपसंचालिका डॉ. विनिता व्यास, विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर, पद्मश्री विजयकुमार शहा आदि उपस्थित होते.



वृक्षलागवड ही केवळ वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाची जबाबदारी आहे, अशी काहीशी भावना होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात सन 2019 पर्यंत 50 कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे.

राज्याची लोकसंख्या 13 कोटी आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने किमान चार झाडे लावणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांनाही त्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यासाठी विविध फळझाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासकीय यंत्रणांच्या जोडीला हजारो हात वृक्षलागवडीसाठी पुढे आले आहेत. त्यातून ही लोकचळवळ बनली आहे.

या मोहिमेतून संपूर्ण मानवजातीला वृक्षलागवडीच्या कर्तव्याचा संदेश दिला गेला. केवळ वृक्षलागवड करून न थांबता वृक्षसंगोपन ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, हे जाणून निसर्गसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


खासदार संजय पाटील म्हणाले, सन 2017 ते 19 या कालावधीत संपूर्ण राज्यात 50 कोटी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत यावर्षी राज्यभरात 13 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 50 कोटी वृक्षलागवड हा राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

एक झाड दोन ते तीन पिढ्यांना उपयुक्त आहे. त्यामुळे हे समाजोपयोगी काम आहे. गत वर्षी 2017 च्या पावसाळ्यात 4 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 8 लाख, 84 हजार उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 9 लाख 14 हजार वृक्षलागवड करण्यात आली होती. यावर्षीही 29 लाख 17 हजार वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड जिल्ह्यात होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


वृक्षलागवडीच्या या मोहिमेत आबालवृद्ध एक दिलाने, एक मनाने, संपूर्ण ताकदीने आणि तन, मन, धन अर्पून सहभागी झाले आहेत, याचा आपल्याला विशेष अभिमान आहे, असे स्पष्ट करून आमदार सुरेश खाडे म्हणाले, दंडोबा हे एक पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून, त्याच्या पर्यटन विकासासाठी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी दिला. त्यातून रस्ते, पाणी, वीज अशा सुविधा पर्यटकांना दिल्या. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षात झालेल्या वृक्षलागवडीतील झाडे जगण्यासाठी दंडोबा मंदिर परिसरात तीन किलोमीटर ठिबक सिंचन केले आहे. त्यातून शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही झाडे जगवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

50 कोटी वृक्षलागवड या महत्त्वांकाक्षी मोहिमेत गत वर्षी सांगली जिल्ह्यात केलेल्या वृक्षारोपणातील 85 ते 87 टक्के रोपे जिवंत आहेत, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या 43 रोपवाटिकेमध्ये 45 लाख रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी 29 लाख 17 हजार रोपांची या वर्षी लागवड करण्यात येणार आहेत. उर्वरित रोपे पुढील वर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहेत. विविध यंत्रणांच्या माध्यमातून महिनाभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

पद्मश्री विजयकुमार शहा यांनी जिल्ह्यात 5 लाख विद्यार्थी आहेत. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याचे त्यांनी मनावर घेतले तर जिल्हा हिरवागार होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी वड, आंबा, पिंपळ, जांभूळ, बेल, कडुनिंब, सीताफळ आदि झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, भूजल सर्वेक्षणचे दिवाकर धोटे, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, मिरजचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, मिरजचे तहसीलदार शरद पाटील, मिरज पंचायत समितीचे आणि भोसे व खरशिंग ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
 

Web Title: Sangli: There is no alternative to tree plantation to prevent warming: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.