सांगली : येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित, मान्सून पूर्व तयारीचा आढावा बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:05 PM2018-05-16T17:05:15+5:302018-05-16T17:05:15+5:30

सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तसेच नदीकाठच्या संभाव्य पूरबाधीत गावात येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी येथे दिल्या. याबरोबरच सर्व विभागांनी आपआपल्या स्तरावर येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा.

Sangli: A review meeting of the monsoon pre-arrangement will be implemented from June 1 | सांगली : येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित, मान्सून पूर्व तयारीचा आढावा बैठक 

सांगली : येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित, मान्सून पूर्व तयारीचा आढावा बैठक 

Next
ठळक मुद्देप्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावामान्सून पूर्व तयारीची आढावा बैठक 

सांगली : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तसेच नदीकाठच्या संभाव्य पूरबाधीत गावात येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी येथे दिल्या. याबरोबरच सर्व विभागांनी आपआपल्या स्तरावर येत्या 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय बैठका घ्याव्यात. आवश्यक आपत्ती निवारणाचे सर्व साहित्य सज्ज ठेवावे. तसेच, तालुकानिहाय यंत्रणांंनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी दररोज समन्वय ठेवून अद्ययावत माहिती द्यावी. सर्वच विभागांनी संपर्क क्रमांकासह आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत ठेवावेत, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी येथे दिल्या.

मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, वाळवा उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वारणा आणि कृष्णा नदीकाठची मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील 107 गावे संभाव्य पूर बाधित गावे असून या गावांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत ठेवण्याचे आदेश देऊन प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण म्हणाले, या गावांमध्ये 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन पूर परिस्थितीत सर्व समावेशक उपाययोजना कराव्यात.

आवश्यक आपत्ती निवारणाचे सर्व साहित्य सज्ज ठेवावे. धोकादायक असणाऱ्या निवासी व शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी. तसेच पूर बाधीत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतही आवश्यक नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.

आपत्ती व्यवस्थापनाच्या कामी सर्वच यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून संभाव्य पूर परिस्थितीत मदत व बचाव कार्य गतीमान करावे, असे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण म्हणाले, या काळात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी.

आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच पावसाळी पूरपरिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग, तात्पुरता निवारा, औषध साठा, अन्न-धान्य वितरण, वाहतूक व कायदा सुव्यवस्था, विद्युत पुरवठा या सर्व बाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

धोक्याच्या परिस्थितीपू्‌वी नागरिकांनाही विविध प्रसारमाध्यमांद्वारे सतर्क राहण्याचा संदेश द्यावा. दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास कृषि किंवा वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत मदत/नुकसानभरपाई देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
 

आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्षाचा 0233-2600500 दूरध्वनी क्रमांक असून 1077 हा टोल फ्री क्रमांक आहे. पूर परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत पंचनामे करण्याकरिता पथक सज्ज ठेवावे. नेमणूक करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती तसेच नियंत्रण कक्षाची संपर्क क्रमांकासह माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देण्याच्या सूचना करून प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी विभागनिहाय मान्सून पूर्व तयारीबाबतचा आढावा घेतला.

प्रारंभी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूर परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
 

Web Title: Sangli: A review meeting of the monsoon pre-arrangement will be implemented from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.