Sangli: rape attempt; Prosecuting the accused, incidents of Mirage, 50 thousand Penalties | सांगली : बलात्काराचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी, मिरजेतील घटना, ५० हजारांचा दंड

ठळक मुद्देखटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आलेदंडातील २५ हजारांची रक्कम पीडित महिलेला देण्याचा आदेश

सांगली : मिरजेत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी शाहनूर हाजीसाब शेख (वय ४०, रा. उगार-बुद्रुक, जि. बेळगाव) याला न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, पीडित महिला १९ आॅक्टोबर २०१६ रोजी मिरजेतील वसंत बंधारा येथे कपडे धुण्यासाठी गेली होती. बंधाºयावरील अन्य महिला गेल्याने पीडित महिला एकटीच बंधाऱ्यांवर होती. त्यावेळी आरोपी शाहनूर शेख हा तिच्याजवळ गेला. तिच्याशी अश्लील बोलून लगट करण्याचा प्रयत्न करू लागला.

संबंधित महिलेने त्याला विरोध केला, तरीही तो गेला नाही. शेखने तिला गळा दाबून ठार मारण्याची धमकी देत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर या परिसरातून दुचाकीवरून निघालेल्या दोघांनी धाव घेतली. त्यांनी शेखला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर महिलेने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.

खटल्यामध्ये पीडित महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी या प्रकरणाचे कामकाज पाहिले.

नुकसान भरपाई

न्यायालयाने शेखला पाच वर्षे सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडातील २५ हजारांची रक्कम पीडित महिलेला देण्याचा आदेश दिला आहे.