सांगली : इस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळ, विधानसभा मतदारसंघातील हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:52 PM2018-02-19T17:52:29+5:302018-02-19T17:57:23+5:30

इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.

Sangli: Movement of political equations in Islampur, movements in Vidhan Sabha constituency | सांगली : इस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळ, विधानसभा मतदारसंघातील हालचाली

सांगली : इस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळ, विधानसभा मतदारसंघातील हालचाली

Next
ठळक मुद्देइस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळविधानसभा मतदारसंघातील हालचालीभाजपची उसनवारीच्या तव्यावर पोळी

अशोक पाटील

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मंत्री खोत यांनी राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील, वैभव शिंदे यांना भाजपमध्ये आणून आपली पोळी भाजून घेतली आहे. तर खा. शेट्टी यांनी अलीकडील काही दिवसांत राष्ट्रवादीशी सलगी केली आहे. यामुळे सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील उसाला दर देण्यासाठी शेट्टी व खोत यांनी साखर सम्राटांविरोधात आवाज उठविला होता. साखर सम्राटांचे नेतृत्व करणारे तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात शेट्टी आणि खोत यांनी रान पेटविले होते. लोकसभा निवडणुकीत दोघेही महाआघाडीच्या माध्यमातून भाजपच्या वळचणीला जाऊन बसले.

भाजपला चांगले यशही मिळाले आणि सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यासमोर मंत्रीपद दिसू लागले. ते मिळविण्यासाठी प्रसंगी खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल दिली. त्यासाठी फडणवीस यांच्याकडे वाऱ्याही वाढविल्या. अखेर त्यांना कृषी राज्यमंत्री पद मिळाले.

मंत्रिपदामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे वाटत असतानाच खोत यांनी भाजपची पाठराखण करीत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच रेंगाळत ठेवले. तसेच पुलतांबा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही त्यांनी कसलीही मध्यस्थी केली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष बळावला. तेव्हापासून शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावत गेली.

इस्लामपूर मतदारसंघावर एकमुखी नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीतीलच दोन प्यादी फोडून खोत यांनी स्वत:ची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष (पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे) निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.

इस्लामपूर मतदारसंघात पाचवेळा मुख्यमंत्र्यांनी येऊन शेतकऱ्यांच्या चळवळीबरोबर राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्याचेच काम केले आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर गटांतील कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत इस्लामपूर मतदारसंघात राजकीय समीकरणे रोजच बदलत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Sangli: Movement of political equations in Islampur, movements in Vidhan Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.