लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वर्षश्राद्ध ८ नोव्हेंबरला घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत भाजपच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याचदिवशी कॉंग्रेसला शह देण्यासाठी काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दिन साजरा करण्याचे आवाहन प्रदेश संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी पदाधिका-यांना केले. 
येथील टिळक स्मारक मंदिरात भाजपच्या शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आंदोलनांबाबत संताप व्यक्त करण्यात आला. दोन्ही पक्षांकडून होत असलेल्या सरकारच्या बदनामीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पदाधिकारी आणि नेत्यांनी विरोधकांवर टीकाही केली. यावेळी अनासपुरे म्हणाले की, सरकारला जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीत बदनाम करण्याचा प्रयत्न कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुरू आहे, मात्र जनता त्यांना भूलणार नाही. नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती ते नकारात्मक पद्धतीने साजरी करणार असतील, तर आपण ती सकारात्मक पद्धतीने साजरी करायला हवी. यादिवशी सर्वांनी काळा पैसा विरोधी दिन साजरा करावा. 
खासदार संजय पाटील म्हणाले, नांदेडची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला दहा हत्तीचे बळ आल्याचे वाटत आहे. हा त्यांचा भ्रम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. ८ नोव्हेंबरला ते आक्रोश करणार आहेत. ते सध्या हवेतच वावरत आहेत. भाजपने धोरणात्मक मुद्यांना हात घातल्यास त्यांची हवा निघून जाईल.
प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे म्हणाले, नोटाबंदीमुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांची अडचण झाली. अशाा लोकांचा सरकारविरोधी रोष व्यक्त होणे स्वाभाविक होते. जनआक्रोशच्या नावाखाली असाच रोष आता काळे पैसेवाले व्यक्त करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षाकडून ८ नोव्हेंबरला काळा पैसाविरोधी दिन साजरा केला जाईल. ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचे ९ नोव्हेंबरला काळ्या पैशाविरोधात मार्गदर्शन होणार आहे. 
जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजप जाहिरात करण्यात आघाडीवर असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादी करते. पण केलेल्या विकासकामांच्याच जाहिराती आहेत. त्यात खोटे काय? याची जाणीव त्यांना करुन द्यायला हवी. बदनामी खपवून घेतली जाणार नाही. 
या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, गोपीचंद पडळकर, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजाराम गरुड, दीपक शिंदे-म्हैसाळकर, रणधीर नाईक, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील संस्थांची चौकशी करा!
माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, महापलिका क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. या संस्थांमधील भ्रष्टाचाराबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीपूर्वी सहकारी संस्थांची चौकशी लावण्यात यावी. याबाबत भाजप नेत्यांनी गांभीर्याने घेतल्यास निवडणूक सोपी जाईल. प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर म्हणाल्या, आतापासूनच महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू करायला हवी. 
संजयकाका-घोरपडे शेजारी-शेजारी
गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांपासून फटकून वागत असलेले भाजप नेते संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे शनिवारी बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. व्यासपीठावर ते दोघेही शेजारी-शेजारी बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.