Sangli: In Ajmer Express, the delivery of a migrant woman, delivery of police, treatment in civil | सांगली : अजमेर एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलेची प्रसुती, पोलिसांची मदत, सिव्हिलमध्ये उपचार

ठळक मुद्देमिरज स्थानकात जनरल बोगीत महिलेची सुखरुप प्रसुती रेल्वे पोलिस, प्रवासी महिला डॉक्टर, प्रवासी महिलांनी केली मदतप्रसुती होईपर्यंत अजमेर एक्स्प्रेस मिरज स्थानकात थांबविण्यात आली

मिरज : बेंगलोर-अजमेर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची प्रसुती रेल्वेतच झाली. मिरज स्थानकात रेल्वे पोलिस, प्रवासी महिला डॉक्टर व प्रवासी महिलांच्या मदतीने जनरल बोगीत या महिलेची सुखरुप प्रसुती होऊन पुत्ररत्न झाले. या महिलेच्या प्रसुतीसाठी अजमेर एक्स्प्रेस अर्धा तास विलंबाने रवाना झाली.

बेंगलोर येथे मजुरी करणारा एक गुजराती तरुण २० वर्षीय नऊ महिन्याच्या गर्भवती पत्नीस प्रसुतीसाठी अजमेर एक्स्प्रेसने गावी घेऊन जात होता. आतीबेन राकेश रमेश (रा. बडोदा) या महिलेस मिरज स्थानकात एक्स्प्रेस थांबल्यानंतर प्रसुती वेदना सुरू झाल्या. प्रवाशांनी रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाला माहिती दिल्यानंतर महिला पोलिसांनी या गर्भवती महिलेची मदत केली.

वैद्यकीय मदतीसाठी ध्वनिक्षेपकावरून आवाहन केल्यानंतर एक प्रवासी महिला डॉक्टर मदतीसाठी आली. प्रसुती होईपर्यंत रेल्वेच्या महिला डॉक्टरही धावतपळत आल्या. सर्वांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसुती होऊन पुत्ररत्न झाले.

रेल्वे पोलिसांनी माता व बालकास पुढील उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रसुती होईपर्यंत अजमेर एक्स्प्रेस मिरज स्थानकात थांबविण्यात आली होती. त्यामुळे एक्स्प्रेस अर्धा तास विलंबाने पुण्याकडे रवाना झाली. महिलेचा पती राकेश रमेश याने मदतीबद्दल रेल्वे अधिकारी व पोलिसांचे आभार मानले..